"१६ वं वरीस धोक्याचं..." लग्न वाढदिवसाच्या प्रविण तरडेंनी पत्नीला दिल्या खास शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:22 IST2025-12-03T12:00:22+5:302025-12-03T12:22:22+5:30
प्रविण तरडेंनी पत्नीसाठी पोस्ट शेअर केली आहे.

"१६ वं वरीस धोक्याचं..." लग्न वाढदिवसाच्या प्रविण तरडेंनी पत्नीला दिल्या खास शुभेच्छा
मराठी सिनेइंडस्ट्रीतील रांगडा गडी म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे. एका मागोमाग हिट चित्रपट देणारे प्रवीण तरडे घराघरात लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्या प्रत्येक सिनेमातून त्यांनी समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दर्जेदार कलाकृतींसाठी ते कायमच चर्चेत असतात. प्रवीण हे प्रोफेशनल सोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. प्रवीण यांनी २००९ मध्ये स्नेहल तरडे यांच्यासोबत लग्न केलं. प्रवीण यांची पत्नीसुद्धा अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे. काल त्यांनी लग्नाचा १६ वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी प्रविण तरडेंनी पत्नीसाठी पोस्ट शेअर केली आहे.
प्रवीण तरडे यांनी त्यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त पत्नीसोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "१६ वं वरीस धोक्याचं... हो माझ्याशी लग्न करण्याचा धोका पत्करून स्नेहलनं जे धाडस दाखवलं त्याला आज १६ वर्षं पुर्ण झाली. स्नेहल या साहसीदिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा... लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको". त्यांच्या या पोस्टवर स्नेहल यांनी कमेंट करत लिहलं, "धन्यवाद आणि तुला तुझ्या पुण्यफल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा". प्रवीण तरडे यांची ही रोमँटिक पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. चाहत्यांनी आणि कलाकारांनी या पोस्टवर कमेंट्स करत या जोडप्याला त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
लग्नाच्या प्रत्येक वाढदिवशी एक फ्लॅट गिफ्ट
प्रवीण तरडे यांना एकदा नाटकासाठी स्त्री कलाकाराची गरज असताना त्यांची भेट स्नेहल यांच्याशी झाली. नाटकाच्या प्रयोगांसाठी बाईकवरून एकत्र प्रवास करताना त्यांची चांगली मैत्री झाली. प्रवीण यांच्या कलेची तळमळ पाहून स्नेहल त्यांच्या प्रेमात पडल्या आणि हे प्रेम एकतर्फी नव्हते. अखेर, प्रवीण यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्नाची मागणी घातली. स्नेहल यांनी होकार दिल्यावर २ डिसेंबर २००९ रोजी हे जोडपे विवाहबंधनात अडकले. संसार सुरु झाला असला तरी स्नेहल आणि प्रवीण यांचा प्रवास तितका सोपा नव्हता, तुटपुंजे पैसे आणि भाड्याचा घरात संसार चालवणे कठीण जात होत. असे असतानाही स्नेहल प्रवीण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. पुढील ७ वर्ष सतत १८- १८ तास काम करत इंडस्ट्रीमध्ये स्वतःच अस्तित्व निर्माण केले आणि या ७ वर्षात लग्नाचा प्रत्येक वाढदिवशी एक फ्लॅट गिफ्ट म्हणून दिला.