प्रथमेश परबच्या 'एक नंबर'चे मोशन पोस्टर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 16:31 IST2021-08-31T16:31:22+5:302021-08-31T16:31:57+5:30
मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शित ‘एक नंबर’ या आगामी मराठी चित्रपटाचे लक्षवेधी मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.

प्रथमेश परबच्या 'एक नंबर'चे मोशन पोस्टर रिलीज
‘टकाटक’च्या माध्यमातून रसिकांचे यशस्वी मनोरंजन केल्यानंतर मिलिंद कवडे नेमके कोणत्या प्रकारचा नविन चित्रपट घेऊन येणार याबाबत कुतुहल निर्माण झाले होते. मिलिंद एका नव्या चित्रपटाच्या कामात बिझी होते. हा चित्रपट नेमका कोणता आहे या रहस्यावरून आता पडदा उठला आहे. करियरमधील पहिल्या चित्रपटापासून प्रेक्षकांची आवड ओळखून आपल्या मनातील विषय यशस्वीपणे सादर करणारे मिलिंद पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘एक नंबर’ या आगामी मराठी चित्रपटाचे लक्षवेधी मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे.
धुमाळ प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत तसेच आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने तयार झालेल्या ‘एक नंबर’ या चित्रपटाची निर्मिती करण्याची जबाबदारी महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाद्वारे धुमाळ प्रोडक्शन सिनेनिर्मितीकडे वळले आहे. लक्षवेधी शीर्षक असलेले चित्रपट बनवण्यात आघाडीवर असलेल्या मिलिंद यांच्या ‘एक नंबर’ या चित्रपटाचे टायटलही खरोखर कडक आहे. ‘येडयांची जत्रा’पासून मिलिंद यांनी सुरू केलेला दिग्दर्शनातील प्रवास ‘टकाटक’सारख्या हिट चित्रपटासोबत ‘एक नंबर’ या सिनेमापर्यंत येऊन पोहोचला आहे. यावेळी मिलिंद मिस्ट्री कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार असल्याची झलक रिलीज करण्यात आलेल्या मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळते.
‘एक नंबर’ या चित्रपटाबाबत मिलिंद म्हणाले की, चित्रपटाच्या कथेला पूरक शीर्षक ठेवणं हे त्यातील विषयाला न्याय देण्यासाठी गरजेचं असतं. या चित्रपटाचं ‘एक नंबर’ हे शीर्षकही कथानकाला साजेसं असल्यानंच ठेवण्यात आल्याचं रसिकांना चित्रपट पाहिल्यावर जाणवेल. या माध्यमातून मिस्ट्री कॉमेडी हा जॉनर हाताळला असून, प्रेक्षक त्याला नक्कीच दाद देतील अशी आशाही मिलिंद यांनी व्यक्त केली आहे.
‘एक नंबर’ या चित्रपटातही प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रथमेशच्या जोडीला मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा धावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी आदी कलाकार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा मिलिंद कवडे यांनीच लिहिली असून संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे.
हजरत शेख (वली) या चित्रपटाचे डीओपी आहेत. पटकथा सहाय्यक म्हणून संजय नवगिरे आणि सुनिल मगरे यांनी काम पाहिले आहे. संकलन प्रणव पटेल यांनी केलं असून पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिलं आहे. जय अत्रेनं लिहिलेल्या गीतरचना संगीतकार वरूण लिखते यांनी संगीतबद्ध केल्या आहेत.