प्रसाद ओकने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, खंत व्यक्त करत म्हणाला, "आपण मराठीचे चाहते आहात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:16 IST2025-01-28T17:16:18+5:302025-01-28T17:16:47+5:30
मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सर्वांच्या मनातली गोष्ट शेअर केलीय (prasad oak)

प्रसाद ओकने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, खंत व्यक्त करत म्हणाला, "आपण मराठीचे चाहते आहात..."
सध्या 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या सिनेमाची उत्सुकता आहे. हा सिनेमा काहीच दिवसांमध्ये थिएटरमध्ये रिलीज होतोय. अशातच या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने एक अनोखी संकल्पना राबवली जात आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या मनातील एका व्यक्तीला पत्र लिहून त्यांच्या मनातल्या भावना शब्दबद्ध करत आहेत. अशातच मराठी अभिनेता प्रसाद ओकने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याच्या मनातील खंत व्यक्त केली.
प्रसाद ओकचंं मुख्यमंत्र्यांना पत्र
माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य,
मराठीमध्ये अनेक नवनवीन चित्रपट निर्माण होत आहेत. पण प्रत्येक मराठी चित्रपटाला मोठ्या निर्मात्याचं किंवा मोठ्या स्टूडिओचं पाठबळ मिळतंच असं नाही. अशावेळी त्या चित्रपटाला गरज असते ती चांगल्या, उत्तम थिएटरमध्ये प्राइम टाइमच्या शोची. असे शो जर या चित्रपटाला मिळाले तर त्याचा फायदा होऊ शकतो. आर्थिक नुकसानीपासून हे असे चित्रपट निर्माते वाचू शकतात.
या विषयावर वारंवार बोलणं झालं, तक्रारी झाल्या पण यावर ठोस असा उपाय अजूनही निघालेला दिसत नाहीये. आपण मराठीचे चाहते आहात, मराठीवर निस्सिम प्रेम करणारे आहात. आपल्या हक्काच्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या हक्काच्या मराठी सिनेमाला वारंवार ही मागणी का करावी लागते? याची खंत वाटते. आपण यावर त्वरीत कायमचा तोडगा काढाल याची खात्री वाटते.
उत्तराच्या प्रतीक्षेत कलासृष्टीचा नम्र सेवक,
प्रसाद ओक
अशा शब्दात प्रसाद ओकने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मनातली खंत व्यक्त केलीय. ज्या सिनेमाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवला जातोय त्या सिनेमाचं नाव 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'. हा सिनेमा ३१ जानेवारीला रिलीज होत असून मंगेश देसाईंनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. बालकलाकार मायरा वायकुळ सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे.