'पवित्र रिश्ता' मालिकेसाठी आलेलं स्थळ नाकारलं..., प्रार्थना बेहेरेचा खुलासा; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 19:06 IST2026-02-06T18:46:49+5:302026-02-06T19:06:58+5:30
मालिका मिळाली नसती तर लग्न करुन लंडनला सेटल झाले असते...प्रार्थना बेहेरेचं अरेंज मॅरेज होणार होतं?

'पवित्र रिश्ता' मालिकेसाठी आलेलं स्थळ नाकारलं..., प्रार्थना बेहेरेचा खुलासा; म्हणाली...
प्रार्थना बेहेरे हे मराठीतलं घराघरात पोहोचलेलं नाव आहे. दिसायला सुंदर, घारे डोळे, तजेलदार त्वचा, हसतमुख चेहरा यामुळे प्रार्थनाने कायम सर्वांना प्रेमात पाडलं आहे. अनेक मालिका, सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाची ताकद दाखवली आहे. 'मितवा','कॉफी आणि बरंच काही','बाई गं' आणि आताच रिलीज झालेला तिचा 'अगं अगं सूनबाई, काय म्हणताय सासूबाई' हा सिनेमाही तुफान गाजतोय. प्रार्थना अभिनेत्री होण्याआधी मनोरंजन पत्रकार होती. 'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे तिला पहिल्यांदा ओळख मिळाली. ही मालिका मिळाली नसती तर प्रार्थना लग्न करुन लंडनला स्थायिक झाली असती असा खुलासा तिने नुकताच केला.
आरपारला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थना बेहेरे म्हणाली, "माझं लग्न ठरलं होतं. तो मुलगा लंडनचा होता. अरेंज मॅरेज होतं. मी तेव्हा त्यांना होकारही दिला होता. पण मध्येच मला 'पवित्र रिश्ता' मालिका मिळाली. तेव्हा त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 'तीन वर्ष लग्न करता येणार नाही, प्रेग्नंट राहता येणार नाही...' अशा अटी होत्या. मग मी ते आईला दाखवलं आणि तिला सांगितलं की मुलाला आता नकार देऊया. आई म्हणाली, 'अगं असं कसं?' त्यावर मी आईला म्हणाले,'तुला काय हवंय? मी करिअरमध्ये पुढे जायला नकोय का..मी लग्न करावं का?'. तर बाबा म्हणाले की 'नाही, तू करिअर कर. आपण तुझ्या लग्नाचं नंतर बघू'. म्हणून तो फुलस्टॉप आला."
प्रार्थनाने नंतर अनेक मालिका, सिनेमांमधून प्रेक्षकांवर छाप पाडली. तिची 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकाही खूप गाजली. यात तिची श्रेयस तळपदेसोबत जोडी जमली होती. तर वैयक्तिक आयुष्यात प्रार्थनाने २०१७ साली अभिषेक जावकरसोबत लग्नगाठ बांधली. अभिषेक दिग्दर्शक, निर्माता आहे. दोघांची जोडी खूप गोड असून प्रार्थना अनेकदा नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत असते. लवकरच ती नवऱ्याने दिग्दर्शित केलेल्या आगामी मराठी सिनेमात दिसणार आहे.