प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनीनं केली मोठी घोषणा, व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:40 IST2025-11-19T14:40:16+5:302025-11-19T14:40:47+5:30
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांनी त्यांच्या चाहत्यांना एक मोठं 'सरप्राईज' दिलं आहे.

प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनीनं केली मोठी घोषणा, व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
मराठी चित्रपटसृष्टीतील प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी ही जोडी सध्या प्रेक्षकांच्या सर्वाधिक आवडत्या जोड्यांपैकी एक आहे. गश्मीर महाजनी आणि प्राजक्ता माळी यांनी २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फुलवंती' या सिनेमामध्ये एकत्र काम केलेलं. या जोडीला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. अशातच प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांनी त्यांच्या चाहत्यांना एक मोठं 'सरप्राईज' दिलं आहे.
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी या दोघांनी नुकताच सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. प्राजक्ता आणि गश्मीर यांचा 'फुलवंती' आता हिंदी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.मराठी प्रेक्षकानंतर हिंदी प्रेक्षकांकरीता प्राजक्ता आणि गश्मीर यांनी 'फुलवंती' डब केला आहे.
विशेष म्हणजे 'फुलवंती'चं हिंदीत डबिंग प्राजक्ता आणि गश्मीर यांनीच केलं आहे. त्यामुळे प्राजक्ता आणि गश्मीर यांच्याच आवाजात हिंदीत 'फुलवंती' पाहता येणार आहे. तसेच या चित्रपटातील गाणीदेखील हिंदीत प्रदर्शित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. प्राजक्ता आणि गश्मीर यांनी स्वतः याबद्दल व्हिडीओमधून माहिती दिली.
"मराठी चित्रपट राष्ट्रीय स्तरावर पोहचवा, म्हणून चित्रपटाचं डबिंग हिंदीत केलं", असं गश्मीरनं म्हटलं. प्राजक्ता आणि गश्मीरने हा व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रिया उमटू लागल्या. मराठी चाहत्यांसह हिंदी प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केला. तसेच ते दोघे लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. मात्र, चाहत्यांची उत्सुकता वाढवत, तो प्रोजेक्ट नेमका कोणता आहे, याबद्दलची जास्त माहिती मात्र त्यांनी यावेळी शेअर केली नाही.
दरम्यान, प्राजक्ता माळी तिच्या सहजसुंदर अभिनय, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते, तर गश्मीर महाजनीने आपल्या डॅशिंग लूक आणि कसदार अभिनयाच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि विविध मालिकांमधून प्राजक्ता घराघरात पोहोचली, तर गश्मीरने 'देऊळ बंद', 'काहे दिया परदेस' आणि 'सरसेनापती हंबीरराव' यांसारख्या चित्रपटांतून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.