जयपूर फिल्म फेस्टिव्हलसाठी प्रॅक्टिकल लघुपटाची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 17:28 IST2016-12-24T17:28:52+5:302016-12-24T17:28:52+5:30
तरुणाईतील संवेदनशीलता कमी झाली आहे, ते स्वत:च्या विश्वात गुरफटलेले असतात, अशी ओरड नेहमी केली जाते. ही ओरड खोटी ठरवत ...
.jpg)
जयपूर फिल्म फेस्टिव्हलसाठी प्रॅक्टिकल लघुपटाची निवड
रुणाईतील संवेदनशीलता कमी झाली आहे, ते स्वत:च्या विश्वात गुरफटलेले असतात, अशी ओरड नेहमी केली जाते. ही ओरड खोटी ठरवत कलाप्रेमी असलेल्या मयुरेश वाघे या तरुणाने एक लघुपट तयार केला आहे. त्याच्या या लघुपटाचे नाव 'प्रॅक्टिकल' असे आहे. या लघुपटाच्या माध्यमातून सध्याच्या बदलत्या परिस्थितीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. पुणे फिल्म फेस्टिव्हल तसेच जानेवारीत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या इंदापूर फिल्म फेस्टिव्हलसाठी या लघुपटाची निवड झाली आहे. जयपूर फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील हा लघुपट झळकणार आहे. त्याच्या या लघुपटाविषयी मयुरेश सांगतो, आपल्याकडे लघुपटांना फारसे प्रोत्साहन मिळत नाही. इतर देशांप्रमाणे शासन स्तरावर कलेची दखल घेतली जात नाही. शासनातर्फे लघुपटाची एखादीच स्पर्धा आयोजित केली जाते. मात्र, त्याची माहिती तरूणाांर्यंत पोचत नाही. अशा स्पर्धांची माहितीचा प्रचार आणि प्रसार झाल्यास त्याचा उपयोग होईल.'मयुरेश हा मूळचा कल्याणचा आहे. दहावीनंतर घराजवळच्या एका अभिनय कार्यशाळेमध्ये त्याने सहभाग घेतला. तेथे शिकवले जाणारे अभिनय कौशल्य, या क्षेत्रातील बारकावे याची त्याला माहिती मिळाली आणि याच क्षेत्रात करिअर करण्याचा त्यांचा निर्णय पक्का झाला. तसेच लघुपटातून साधा पण विचार करायला लावणारा विषय रसिकंपर्यंत नेमकेपणाने पोचवता येतो, या विचाराने मे २०१६ मध्ये 'प्रॅक्टिकल' या लघुपटाचे काम मयूरेशने हाती घेतले. याचे दिगदर्शन मयुरेशचे असून आनंद म्हसवेकर यांनी लेखन केले आहे. आई-वडील लहान असल्यापासून मुलांच्या भविष्याची स्वप्ने पाहतात. त्यांच्यावर संस्कार करून त्यांची जडणघडण करतात. मुले शिकून मोठी झाली की शिक्षणासाठी, नोकरीसाठी त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळते. मुले तिकडेच स्थिरस्थावर होतात. इकडे आई-वडील एकाकी जीवन जगतात. एकटेपणा दूर करण्यासाठी ते वृद्धश्रमाचा रस्ता धरतात. मुले आपल्या आयुष्यात इतकी गुंतलेली असतात, की त्यांना आई- वडिलांशी हितगुज करायलाही वेळ नसतो. बरेचदा, पालक निवर्तल्यावर त्यांच्या अंत्यविधीलाही मुले येऊ शकत नाहीत. हेच प्रखर वास्तव 'प्रॅक्टिकल' या लघुपटाच्या माध्यमातून मांडण्याचा मयुरेश वाघेने प्रयत्न केला आहे. पुढील लघुपटामध्ये देहदानावर भाष्य करण्याचे त्याने ठरवले आहे.