ओम फट्ट स्वाहा! पुन्हा एकदा तात्या विंचूची दहशत, महेश कोठारेंची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 17:15 IST2023-03-23T17:15:33+5:302023-03-23T17:15:56+5:30
Mahesh Kothare : 'झपाटलेला ३' सिनेमा भेटीला येणार असल्याचे महेश कोठारे यांनी झी चित्रपट गौरव पुरस्कार सोहळ्यादरम्यान सांगितले.

ओम फट्ट स्वाहा! पुन्हा एकदा तात्या विंचूची दहशत, महेश कोठारेंची मोठी घोषणा
नव्वदचं दशक मराठी चित्रपटांसाठी सुवर्ण काळ मानला जातो. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ या अभिनेत्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेइंडस्ट्रीवर अधिराज्य गाजविले. महेश कोठारे यांचे अनेक सिनेमे ९० च्या दशकात सुपरहिट ठरले होते. महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला चित्रपट सुपरहिट ठरला. इतकेच नाही तर यातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे. यातील तात्या विंचूने प्रेक्षकांमध्ये जास्त दहशत निर्माण केली होती. पुन्हा एकदा तात्या विंचू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खुद्द महेश कोठारे यांनी स्वतःच याबाबत खुलासा केला आहे.
महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने अजरामर केलेला तात्या विंचू यापूर्वी 'झपाटलेला २' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यात अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत होता. मात्र आता 'झपाटलेला ३' लवकरच भेटीला येणार आहे. महेश यांनी झी चित्रपट गौरवच्या रेड कार्पेटवर याबद्दल सांगितले आहे.
कोकण हार्टेड गर्लने महेश कोठारे यांची झी चित्रपट गौरवमध्ये मुलाखत घेतली. तेव्हा तिने त्यांचा २०२४ साली 'तळतळाट' हा चित्रपट येत असल्याचे म्हटले. सोबतच त्यात तात्या विंचू, कुबड्या खविस असे सगळे व्हिलन एकत्र असणार असल्याचे म्हटले. त्यावर महेश कोठारे म्हणाले की, 'तुला कसं कळलं? खरेच तात्या विंचू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाचे नाव तळतळाट असेल की नाही ठाऊक नाही पण २०२४ किंवा २०२५ मध्ये तात्या विंचू पुन्हा सगळ्यांच्या भेटीला येणार आहे.'
महेश कोठारे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची हिंट दिली असल्याचे म्हणता येईल. २०२४ किंवा २५ मध्ये पुन्हा एकदा तात्या विंचू आपल्या भेटीला येणार आहे.