"एवढी सुंदर बाई आणि हिचा आवाज असा..." साडी नेसलेल्या सचिन यांची 'ती' कृती अन् रिक्षावाल्याची उडाली भंबेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:23 IST2025-10-07T11:21:18+5:302025-10-07T11:23:18+5:30
'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाच्या शुटिंगवेळी एक धमाल किस्सा घडला होता.

"एवढी सुंदर बाई आणि हिचा आवाज असा..." साडी नेसलेल्या सचिन यांची 'ती' कृती अन् रिक्षावाल्याची उडाली भंबेरी
१९८८ साली प्रदर्शित झालेला सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट आजही आवडीने पाहिला जातो. मराठी चित्रपटसृष्टीतील 'कल्ट क्लासिक' सिनेमा म्हणून 'अशी ही बनवाबनवी' ओळखला जातो. या सिनेमातील डायलॉग चाहत्यांच्या ओठावर कायम असतात. त्याचबरोबर या सिनेमातील गाणीसुद्धा तितकीच लोकप्रिय आहेत. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान घडलेला एक धमाल आणि अविस्मरणीय किस्सा अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नुकतंच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. ज्यामध्ये अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांच्या एका कृतीमुळे एका रिक्षावाल्याची भंबेरी उडाली होती.
'बनवाबनवी' या सिनेमात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी स्त्री भूमिकासुद्धा साकारल्या होत्या. सचिन हे साडीत खूप सुंदर दिसत होते. त्यामुळे ते पुरुष आहेत, हे वाटतंच नव्हतं. निवेदिता यांनी सांगितलं की, चित्रपटातील एका सीनच्या शुटिंगदरम्यान रिक्षावाल्याला ते पुरुष आहेत, याचा अजिबात अंदाज नव्हता. पण, सचिन मूळ पुरुषी आवाजात जोरात बोलले आणि साडी नेसलेल्या एका सुंदर बाईचा अचानक पुरुषी आवाज ऐकून तो रिक्षावाला क्षणभर पूर्णपणे कावराबावरा (Shocked) झाला होता.
लोकतम फिल्मीशी बोलताना निवेदिता म्हणाल्या, "आम्ही नानावटी बंगल्यात शूट करत होतो. बनवाबनवी करताना कळत होतं. की काहीतरी छान करतोय आपण. ते एवढं ग्रेट, कल्ट सिनेमा असेल असं वाटलं नव्हतं. चित्रपटात सचिन आणि लक्ष्मीकांत दोघेही साडी नेसतात. चित्रपटाचे दोन शॉट होते. बंगल्याबाहेर त्यांनी कॅमेरा लावला होता. सचिन आणि ते सगळे चौघेजण रिक्षातून उतरतात आणि येतात. आणि दुसरं मी आणि सुप्रिया रिक्षातून उतरून येतो आणि आत जायला लागतो. 'बनवा बनवी' गाण्याच्या शेवटी तो शॉट आहे. त्याच्या आधी त्यांनी त्यांचा शॉट लावला होता. एकाच वेळेला त्यांनी दोन्ही शॉट घेतले होते".
निवेदिता यांनी पुढे सांगितलं की, "ते कुठलेतरी रिक्षवाले आणले होते. तर ते असे उतरले आणि सचिन त्याच्या आवाजात जोरात बोलला, काय रे ते इकडे... तर तो रिक्षावाला एकदम कावराबावरा झाला आणि घाबरला. ही का अशा आवाजात बोलतेय. त्या रिक्षावाल्याचे हावभाव इतके भारी होते आणि आम्ही इतके हसायला लागलो की काही विचारू नका. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर असे भाव होते की साडी नेसलेली ऐवढी सुंदर बाई आणि हीचा आवाज असा. सचिन दिसतंच इतका सुंदर होता की कुणाचाही विश्वास बसला असता ती बाई आहे".