Nagraj Manjule : कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर सिनेमा बनवणार, नागराज मंजुळेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 16:46 IST2023-02-22T16:45:12+5:302023-02-22T16:46:55+5:30
नागराज यांचा सिनेमा म्हणलं की काहीतरी खास असणार असंच अपेक्षित असतं.

Nagraj Manjule : कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर सिनेमा बनवणार, नागराज मंजुळेंची घोषणा
सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे(Nagraj Manjule) वेगवेगळ्या विषयांवर कल्पक सिनेमा बनवण्यासाठी ओळखले जातात. नागराज यांचा सिनेमा म्हणलं की काहीतरी खास असणार असंच अपेक्षित असतं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. यावेळी त्यांनी कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे.
'सैराट', 'फॅंड्री', 'झुंड' सारखे हिट सिनेमे बनवणारे नागराज मंजुळे प्रत्येक वेळी काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करतात. आता त्यांनी खाशाबा जाधव यांच्यावर चित्रपट बनवण्याचा आव्हान उचलले आहे. 'मराठी माती आणि महाराष्ट्राचं नाव जगभर गाजवणारे खाशाबा जाधव. असं स्वप्न महाराष्ट्राला पुन्हा पडो ही सदिच्छा' अशा आशयाची पोस्ट नागराज यांनी खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त लिहिली होती.
खाशाबा जाधव हे गावच्या लाल मातीत खेळले आणि त्यांनी थेट ऑलिम्पिक मेडल पटकावत देशाचे नाव उंच केले.त्यांनी देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं. याच लाल मातीतून त्यांच्या जीवनावर सिनेमा बनवण्याची घोषणा नागराज यांनी केली आहे. ते म्हणाले,'खाशाबा जाधव हे जागतिक किर्तीचे आणि दर्जाचे पैलवान होते. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची नेहमीच इच्छा होती. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.माझ्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे. लवकरच मी यासंदर्भात अधिक माहिती देईल. या सिनेमाचं शूटिंगदेखील कोल्हापुरात होऊ शकतं. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तो काळ अनुभवायला मिळणार आहे.'
नागराज मंजुळे यांचा 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Bandook Biryani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात आकाश ठोसर, सयाजी शिंदे मुख्य भूमिकेत आहेत. येत्या 7 एप्रिलला हा सिनेमा मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.