"मन सुन्न झालंय..अजूनही...", प्रिया मराठेच्या निधनानंतर नित्यश्री ज्ञानलक्ष्मीची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:37 IST2025-09-02T12:36:29+5:302025-09-02T12:37:16+5:30

Priya Marathe : लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं नुकतेच कर्करोगाने निधन झालं. तिच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला.

''My mind is numb..still...'', Nityashree Dyanalakshmi's emotional post after Priya Marathe's death | "मन सुन्न झालंय..अजूनही...", प्रिया मराठेच्या निधनानंतर नित्यश्री ज्ञानलक्ष्मीची भावुक पोस्ट

"मन सुन्न झालंय..अजूनही...", प्रिया मराठेच्या निधनानंतर नित्यश्री ज्ञानलक्ष्मीची भावुक पोस्ट

लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे(Priya Marathe)चं नुकतेच कर्करोगाने निधन झालं. तिच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला. प्रियाचे असं अचानक जाणं अनेकांना चटका लावणारं होतं. दरम्यान अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी (Nityashree Dyanalakshmi) हिने प्रियासोबतच्या आठवणींना उजाळा देत भावुक पोस्ट शेअर केली आहे.

नित्यश्री ज्ञानलक्ष्मीने प्रिया मराठेसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले की, ''खरंतर माझी लिहिण्याची हिंमत होत नाहीये. कालपासून मन सुन्न झालंय..अजूनही इतक्या मोठ्या धक्क्यातून मला बाहेर येता येत नाही..माझ्यासारखीच अवस्था आपल्या सगळया मित्र मैत्रिणींची झाली आहे. ''

तिने पुढे लिहिले की, ''२००९ ला स्टार प्रवाह वाहिनी नुकतीच नवीन आली होती..त्यावर 'गोष्ट एका कॉलेज'ची मालिकेत आपण एकत्र काम केलं. रसिका वेंगुर्लेकर आणि मी खूप नवख्या होतो. नुकतंच एकांकिका आणि नाटकातून आम्ही मालिका विश्वात पदार्पण केलं होतं..मालिका २४ भागांचीच होती..शूटिंग च्या पहिल्याच दिवशी आम्ही जरा घाबरून होतो की मालिकेची हिरॉईन कोण असेल? कशी असेल? तू बाहेरूनच सगळ्यांना गुड मॉर्निंग करत मेकअप रूममध्ये शिरलीस..क्षणभर आम्ही गोंधळलो..कारण आत येऊन तू आम्हांला देखील गुड मॉर्निंग करत आमची नावं विचारून तू स्वतः आमच्याशी ओळख करून घेतलीस..तेव्हा तुझ्यातील प्रेमळ, हसरी, लाघवी, निखळ, मनमिळाऊ,आकाशात उंच झेप घेत असताना देखील पाय मात्र जमिनीशी घट्ट धरून ठेवणारी प्रिया मनात कायमची घर करून गेली. तू एक स्वच्छंदी फुलपाखरू होतीस..तू जिथे जायचीस तिथल्या वातावरणात ऊर्जा, तेज, आनंद, आपलेपणा देऊन जायचीस..तुझ्या कामाविषयी असलेली तुझी निष्ठा, सातत्य,भूमिकेचा बारकाईने केला जाणारा अभ्यास,प्रामाणिकपणा खरंच कौतुकास्पद होता आणि तो कायम राहील..''


''कलाकार हा लहानमोठा नसून तो कलाकार आहे ही भावना मनात ठेवून आपल्या प्रत्येक लहानमोठ्या कलाकारांसोबत अत्यंत नम्रपणे, आपुलकीने, आदराने, आणि खरी राहून वागणारी तू कधीच स्मृतींआड जाणार नाहीस..आपली मेकअप रूम मधील मस्ती,आपले शूटिंगचे किस्से आम्ही कधीच कुणी विसरणार नाही. कधी लवकर पॅकअप झालं की तू सिनेमागृहात जाऊन नवीन सिनेमा बघायची..आणि दुसर्‍या दिवशी सिनेमाबद्दल in detail आमच्याशी चर्चा करायचीस..एकदा देव डी बघून आलीस आणि पुढील २/३ दिवस फक्त इमोशनल अत्याचार गुणगुणत होतीस..काय आणि किती बोलू?? अजूनही विश्वास बसत नाही की तू आम्हांला सोडून दूर निघून गेलीस..डोळे बंद केले की फक्त तुझा हसरा चेहरा डोळ्यांसमोर लख्ख दिसतो.. जिथे कुठे असशील, तिथे आनंदी रहा..खूप त्रास सहन केलास, शेवटपर्यंत लढत राहिलीस..आपलं दुःख कधी कुणाला सांगत बसून सांत्वन करून न घेता एका वाघिणीसारखं लढलीस,त्यामुळे तुझ्याविषयी माझ्या मनात असणारा आदर आणखी वाढला..काळजी घे..अलविदा नाही म्हणणार..कारण तू कायम असणार आहेस आमच्यासोबत..तुझं कुटुंब, तुझे सगळे मित्र मैत्रीणी, आणि तुझे मायबाप प्रेक्षक तुझ्यावर खूप प्रेम करतात आणि करत राहतील..आय लव्ह यू फॉरेव्हर. "जो आवडतो सर्वांला । तोचि आवडे देवाला ।। फक्तप्रेम.'', असे तिने पोस्टमध्ये लिहिले.

Web Title: ''My mind is numb..still...'', Nityashree Dyanalakshmi's emotional post after Priya Marathe's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.