"शाई निघेल की लोकशाही..." मतदानानंतर तेजस्विनी पंडितची पोस्ट, म्हणाली "ज्याच्या रक्तात मराठी"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:35 IST2026-01-15T16:29:36+5:302026-01-15T16:35:24+5:30
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अभिनत्रीनं पोस्ट शेअर केली आहे.

"शाई निघेल की लोकशाही..." मतदानानंतर तेजस्विनी पंडितची पोस्ट, म्हणाली "ज्याच्या रक्तात मराठी"
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज सर्वत्र मतदान सुरु आहे. सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत सर्व मतदार आपला हक्क बजावत आहेत. निवडणूकीत मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत. नेते मंडळी, सेलिब्रिटीही मतदानाचा हक्क बजावत आहेत. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं देखील तिचा मतदानाचा हक्क बजावत राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत मतदान केलं आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अभिनत्रीनं पोस्ट शेअर केली आहे.
तेजस्विनीने आपल्या पोस्टमध्ये मराठी भाषेबद्दलचा अभिमान व्यक्त करत लिहिले आहे की, "माझा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला. मी लहानाची मोठी मराठी भाषा बोलतंच झाले. याच मराठी भाषेवर कामा रूपी स्वतःचं पोट भरत आले. माझी भाषा टिकली तर माझं काम दिसेल आणि तरचं माझं अस्तित्वही असेल… म्हणूनच आजचं मत त्या मराठी माणसासाठी, ज्याच्या रक्तात मराठी सळसळते आणि ज्याच्या हृदयात आजन्म महाराष्ट्र विराजमान आहे. जय महाराष्ट्र", असं तिनं म्हटलं.
पोस्टच्या शेवटी तेजस्विनीने 'मार्कर पेन'वरही प्रतिक्रिया दिली. मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांच्या बोटांवर मार्करद्वारे लावण्यात येणारी शाई लगेच पुसली जात असल्याचा दावा अनेकांनी केलाय. निवडणुकीत पहिल्यांदाच मार्करचा वापर केला जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून मार्कर पेनद्वारे शाई लावण्याच्या गोष्टीचा कडाडून विरोध करण्यात आला आहे. तर, मार्कर पेनने शाई लावण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाचा असून, आक्षेप असेल तर त्याबाबत कारवाई व्हावी, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
तेजस्विनीने कोणाला दिला पाठिंबा?
तेजस्विनीने या पोस्टमध्ये उघडपणे कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नसले, तरी तिने वापरलेले "रक्तात मराठी" आणि "मराठी माणूस" हे शब्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंवा ठाकरे गटाच्या विचारधारेकडे झुकणारे असल्याचे मत नेटकरी व्यक्त करत आहेत. काही तासांपूर्वीच तिने राज ठाकरे यांचा फोटो शेअर करून त्यांना पाठिंबा दिला होता.