Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
By देवेंद्र जाधव | Updated: October 27, 2025 16:20 IST2025-10-27T16:15:11+5:302025-10-27T16:20:11+5:30
गौरी-गौतम पुन्हा भेटीला येत आहेत. स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेच्या 'मुंबई पुणे मुंबई ४'ची खास घोषणा. बातमीवर क्लिक करुन व्हिडीओ बघा

Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
'मुंबई पुणे मुंबई' हा सर्वांचा आवडता सिनेमा. २०१० साली आलेला हा सिनेमा आजही सर्वांच्या आवडीचा सिनेमा. या सिनेमाने प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने प्रेम जिंकलं. पुढे 'मुंबई पुणे मुंबई २' रिलीज झाला. या सिनेमालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. याशिवाय काही वर्षांपूर्वी आलेला 'मुंबई पुणे मुंबई ३'ला सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता सर्वांसाठी आनंदाची बातमी. 'मुंबई पुणे मुंबई'च्या चौथ्या भागाची अर्थात 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा झाली आहे
स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र
सतीश राजवाडे दिग्दर्शित 'प्रेमाची गोष्ट २' हा सिनेमा दिवाळीत रिलीज झाला. या सिनेमासोबत सतीश राजवाडेंनी 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा करणारा व्हिडीओ शेअर केला. त्यामुळे प्रेक्षकांना खास सरप्राईज मिळालं. '१५ वर्षांपूर्वी सुरु झाला एक रोमँटिक प्रवास', 'नात्यांची गोडवा वाढवायला पुन्हा येतोय' अशा टॅगलाईनखाली 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा करण्यात आली आहे. पुन्हा एकदा स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या लाडक्या जोडीच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना बघायला मिळेल. लवकरच या सिनेमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे 'मुंबई पुणे मुंबई ४'ची अधिकृत घोषणा करतील.
कधी रिलीज होणार?
'मुंबई पुणे मुंबई ४' या सिनेमाची रिलीज डेट अजून जाहीर झाली नसली तरी लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधीच्या तीन भागाप्रमाणे स्वप्नील-मुक्तासोबत चौथ्या भागात विजय केंकरे, सविता प्रभुणे, प्रशांत दामले, मंगल केंकरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता आहे. तिसऱ्या भागाच्या शेवटी गौरी-गौतमला जुळी बाळं झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. आता चौथ्या भागात गौरी-गौतमच्या आयुष्याची कहाणी पुढे कशी रंगणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.