"एका कुत्र्याने माझ्या मांडीचा चावा घेतला, अन्...", 'मुळशी पॅटर्न' मधील पिट्या भाईसोबत घडला भयंकर प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 09:11 IST2026-03-04T09:09:15+5:302026-03-04T09:11:53+5:30
धक्कादायक! पुण्यात 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला, प्रशासनाला विनंती करत म्हणाला-" यांची काहीतरी सोय..."

"एका कुत्र्याने माझ्या मांडीचा चावा घेतला, अन्...", 'मुळशी पॅटर्न' मधील पिट्या भाईसोबत घडला भयंकर प्रकार
Ramesh Pardeshi : गेल्या काही काळापासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा हा चर्चेत आला आहे.रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुध्ये लहान मुले, वयोवृद्ध माणसे तसेच सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर जखमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. या प्रकरणी प्रशासनाने ठोसं पाऊले उचलली मात्र, काही ठिकाणी अजूनही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशातच 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेता पिट्याभाई म्हणजेच रमेश परदेशी यांनी पुण्यातील टेकडीवर त्यांच्यासोबत घडलेल्या भयंकर प्रकाराबाबत सांगितलं आहे.पुण्यातील एका टेकडीवर अभिनेत्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहून रमेश परदेशी यांनी माहिती दिली आहे.
रमेश परदेशी यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, "टेकडीवर कोण असायला हवे ससे. मोर, फिरायला येणारी तरुण, लहान मुले.वृद्ध मालकांसोबत येणारी पाळीव प्राणी,वृक्ष प्रेमी की #भटकी_कुत्री? ...काल नेहमीप्रमाणे ARAl टेकडीवर पळायला गेलो होतो पळत असताना एका ठिकाणी 4 ते 5 कुत्री खात होती तिथून जाताना त्यातल्या एका कुत्र्याने माझ्या मांडीचा चावा घेतला. मी तसचं पुढे गेलो तर माझ्यासारखाच एक प्राणी प्रेमी मित्र 10 ते 12 कुत्र्यांना खायला देत होता (मी पण कधी कधी सीटी मध्ये उपाशी कुत्र्यांना पाव,बिस्किट देत असतो) मी त्याला बोललो अरे ईथे नको देऊ खायला मला आताच एक कुत्रे मागे चावलाय. मेन रोड वर दे नाहीतर हे लहान मुले. वृद्ध ह्यांच्या अंगावर येतात आणि मी निघून गेलो.
त्यानंतर मग पुढे अभिनेत्याने लिहिलंय,"घरी आल्यावर आंघोळ करताना लक्षात आले आपल्याला मगाशी किरकोळ चावलंय असं वाटलेलं ते जास्त दुखतंय. म्हणून सकाळी सरकारी दवाखान्यात गेलो तर त्यांनी सांगितले टोटल 5 इंजेक्शन घ्यावी लागतील काही तरी टाइप 3 आहे म्हणून. आता 2 घेतली अजून 7 दिवसाच्या अंतराने बाकी घ्यायची आहेत.. हेच एखाद्या लहान मुलाला किंवा वृद्ध माणसाला चावले असते तर केवढ्याला पडले असते...?मी पण प्राणी प्रेमी आहे पण मला वाटतय ह्या भटक्या कुत्र्यांची काहीतरी बरी सोय केली पाहिजे राहणे खाण्याची आज एक अंगावर आला चावला मी प्रतिकार करू शकलो पण 10/12 एकदम अंगावर आले तर बरे वाईट काही झाले तर जबाबदार कोण अजून खूप जबाबदाऱ्या अंगावर आहेत."
अभिनेता प्रशासनाला विनंती करत म्हणाला...
शहरातल्या भटक्या कुत्र्यांना जर एका ठिकाणी जमा केले आणि त्यांची नसबंदी केली तर pmc चं काम पण एका ठराविक ठिकाणी रीतसर आणि सुसह्य होईल जे कोणी प्रणिप्रेमी मित्र आहेत ते त्या ठिकाणी येऊन त्यांच्याशी खेळतील त्यांचं आजारपण डॉकटर सगळं एकाठिकाणी होईल.... मानस रस्त्यावर आणि टेकडीवर सुरक्षित फिरतील, कुत्री घाबरून भीतीपोटी त्यांच्यावर attack करणार नाहीत.... माणसाचा आणि कुत्र्याचा दोघांचा जीव अतिशय महत्वाचा आहे दोन्ही जीव सुरक्षित राहतील..... सरकारला विनंती आहे की त्यांनी ह्याची दखल घ्यावी. नगरसेवक,आमदार,महापौर सर्वांना विनंती आहे की भटक्या कुत्र्यांची काही तरी चांगली सोय करावी. ह्या मुक्या प्राण्यांवर पण अन्याय होणार नाही आणि ते पण छान जगतील आणि बाकी नागरिक पण ...परमेश्वर करो आता रेबीज वैगरे नको व्हायला." असं त्यांनी या पोस्टद्वारे म्हटलं आहे.