"हट्टी, त्रासदायक आणि वाईट..." मुक्ता बर्वेची खास पोस्ट व्हायरल, दिलाय मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 11:25 IST2025-07-25T11:12:07+5:302025-07-25T11:25:47+5:30
अतिशय साध्या पण प्रभावी शब्दांत मुक्ता बर्वेनं महत्त्वाच्या विषयावर भाष्य केलं आहे.

"हट्टी, त्रासदायक आणि वाईट..." मुक्ता बर्वेची खास पोस्ट व्हायरल, दिलाय मोलाचा सल्ला
Mukta Barve Motivational Post: बहुआयामी अभिनेत्री मुक्ता बर्वे ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने स्वबळावर नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्राच वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गुणी आणि संवेदनशील म्हणून ओळखली जाणारी मुक्ता बर्वे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कुठल्याही चित्रपटामुळे नव्हे, तर तिनं स्वतःच्या आयुष्यातील एका छोट्या पण महत्त्वाच्या अनुभवातून सकारात्मक संदेश दिलाय. जो तिच्या चाहत्यांच्या मनाला भिडतोय. स्वतःच्या मूळ स्वरूपाचा स्वीकार करणं किती गरजेचं आहे, यावर तिनं भाष्य केलंय.
मुक्ता बर्वेनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिनं तिचे सरळ आणि कुरळे केस अशा लूकमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिनं लिहलं, एक गंमत सांगते. मला कित्ती तरी वर्ष हे माहीतच नव्हतं की माझे केस कुरुळे आहेत. मला वाटायचं माझे केस फार हट्टी, त्रासदायक आणि वाईट आहेत जे कधीच मला हवे तसे, सगळ्यांचे असतात तसे दिसत नाहीत. त्यामुळे मी त्यांना प्रयत्न करून सरळ करायचे आणि ते कुरळे होऊन होऊन मला त्रास द्यायचे. पण एक दिवस साक्षात्काराचा क्षण आला आणि आमच्यातलं भांडण संपल.
ती पुढे म्हणते, "तुमचे केस कुरळे असतील तर त्यांच्याशी लढा देण्यात आयुष्य वाया घालवू नका. आता मी माझ्या कुरळ्या केसांचा आणि माझ्या अस्सल रूपाचा अभिमानाने स्वीकार केला आहे. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकार करू शकलो तर आपल्या आतला झगडाच संपून जातो. तुम्हाला काय वाटतं? आपण आहोत तसं स्वतःला स्वीकारावं की बदलावं? असा प्रश्न तिनं चाहत्यांना केलाय. या पोस्टमध्ये #curly #curlyhair #blackandwhite #muktabarve #ownit #beyourself #beyondmukta #selfie असे हॅशटॅगही तिने दिले आहेत.
आजही समाजात सौंदर्याचे ठराविक निकष आहेत. ज्यांच्याशी अनेक जण स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. पण हे करताना आपण स्वतःच्या मूळ रुपापासून दूर जातो. मुक्तानं दिलेला हा संदेश केवळ केसांपुरता मर्यादित नसून आत्मस्वीकाराचा व्यापक अर्थ सांगतो. या पोस्टला नेटकऱ्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. स्वतःचा स्वीकार म्हणजेच आत्मशांतीकडे एक पाऊल आहे हे तिनं अतिशय साध्या पण प्रभावी भाषेत आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवलं आहे.