प्रविण तरडेंचा करारी बाणा; 'पांडू'मध्ये साकारतायेत महत्त्वपूर्ण भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 17:10 IST2021-11-11T17:05:14+5:302021-11-11T17:10:45+5:30
Pravin tarde: आजवरच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये झळकलेले प्रविण तरडे लवकरच 'पांडू' या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

प्रविण तरडेंचा करारी बाणा; 'पांडू'मध्ये साकारतायेत महत्त्वपूर्ण भूमिका
मराठी कलाविश्वात प्रचंड गाजलेलं नाव म्हणजे अभिनेता प्रविण तरडे(pravin tarde). उत्तम अभिनेता असण्यासोबतच प्रविण तरडे एक लेखक, दिग्दर्शक अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. आजवरच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये झळकलेले प्रविण तरडे लवकरच 'पांडू' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात त्यांचा करारी बाणा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'पांडू' या चित्रपटामध्ये प्रविण तरडे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. नुकताच त्यांचा चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. या फोटोमध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या चेहऱ्यावर करारी भाव दिसून येत आहेत.
पांडू या चित्रपटातील जाणता राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं गाणं नुकतंच आज प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात प्रविण तरडेंचा नवा लूक दिसून आला. यात ते एकाशिवप्रेमी, भारदस्त राजकीय व्यक्तीचं पात्र साकारताना दिसत आहेत.
“या भूमिकेबद्दल मी कमालीचा उत्सुक आहे. हा लूक प्रेक्षकांसमोर कधी येतो याची मी स्वतः गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत होतो. आज झी स्टुडिओजने माझ्या वाढदिवशी हे गाणं आणि माझा हा लूक प्रेक्षकांसमोर आणायचं ठरवलं याहून आनंदाची दुसरी गोष्ट नाही. हे गाणं, हा लूक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे,” असं प्रविण तरडे म्हणाले.
झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या आणि विजू माने यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘पांडू’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टिझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्यासोबत या चित्रपटात कोणते कलाकार असतील याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. त्यातच प्रविण तरडेंना नव्या रुपात पाहिल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता आणि उत्कंठा आणखीनच वाढली आहे.