"मराठीवर अन्याय होईल तेव्हा...", हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर तेजस्विनी पंडितची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 10:44 IST2025-07-02T10:42:38+5:302025-07-02T10:44:32+5:30
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर तेजस्विनी पंडितची प्रतिक्रिया, म्हणाली- "भाषेसाठी उभं राहणं..."

"मराठीवर अन्याय होईल तेव्हा...", हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर तेजस्विनी पंडितची प्रतिक्रिया
Tejaswini Pandit On Hindi Language Decision : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सुत्रावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदी सक्तीवरुन राज्यातील सामान्य नागरिकांसोबतच विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. हा सर्व विरोध पाहून आज अखेर राज्य सरकारने हिंदी सक्ती बाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले. याप्रकरणी अनेक राजकीय मंडळींसह मराठी कलाविश्वातूनही अनेक कलाकार व्यक्त झाले होते. हिंदी सक्तीच्या विरोध दर्शवत अनेकांनी आवाज उठवला होता. यावर आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) भाष्य केलं आहे.
सध्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिचा आगामी 'ये रे ये रे पैसा-३' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचनिमित्ताने 'सकाळ प्रिमिअर'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानिमित्ताने तिची प्रतिक्रिया दिली. त्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, "मला वाटतं ज्या राज्यात मी राहते, ज्या भाषेत मी काम करते. शिवाय ज्या भाषेच्या माध्यमातून माझं पोट भरते त्या भाषेसाठी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. मला प्रचंड अभिमान आहे की मी त्यासाठी उभी राहिले. मग यावर जे लोक बोलतात की, तुम्ही हिंदीत कसं काम करता. मग तुम्ही वेगळ्या भाषेत कामच करणार नाहीत का. त्यांना माझं असं सांगायचं आहे की, आमचा भाषेला कधीच विरोध नव्हता."
त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली, "आम्ही हिंदी भाषेविरुद्ध नाही तर आमचं सक्तीविरुद्ध आंदोलन चालू होतं. त्याच्याविरुद्ध आम्ही बोलत होतो. तर याच्यात हिंदीचा मुद्दा कधीच नव्हता किंवा कुठली भाषा चांगली कुठली वाईट हाही मुद्दा नव्हता. मराठी भाषा हवी आणि ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याची भाषाही मराठीच आहे. मराठी भाषा इतरांनीही शिकली तर आम्हाला आनंदच होईल."
मग ती म्हणाली, "आता आम्ही हिंदी सिनेमांमध्येही काम करतो तिथेही आम्ही पैसे कमावतो. पण, त्याच्यासाठी आम्हाला हिंदी भाषेची सक्ती करावी लागली नाही. आम्ही पाचवीपासूनच हिंदी शिकलो आणि तरीही आज हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. अगदीच लहान मुलं जी पहिली त चौथीत शिकत आहेत त्या मुलांच्या खांद्यावर आपण किती भाषेचं ओझं टाकणार आहोत. आणि तेही कुठल्या राज्यात ज्या राज्याची भाषा मराठी आहे, ती त्यांना आलीच पाहिजे. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. पण, आम्हाला ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी, संस्कृत किंवा जर्मन भाषा शिकायाची असल्यास, प्रत्येकाला ते स्वातंत्र्य असायला हवं."
महाराष्ट्रावर आणि मराठीवर कुठल्याही पद्धतीने अन्याय होईल तेव्हा...
याबद्दल बोलताना अभिनेत्रीने म्हटलं, "मला असं वाटतं की, आम्ही जे बोलत आहोत हे त्यांनाच कळेल जे सुज्ञ आहेत. त्या सुज्ञ माणसांना हे नक्कीच कळेल की आम्ही हिंदीच्या विरोधात नाही सक्तीच्या विरोधात होतो. आता जो जीआर आला आहे त्याचं स्वागत आहे, आनंद आहे. हे मराठी माणसाचं यश आहे. मराठी माणसाची वज्रमुठ अशीच कायम राहुदे. आपण सतर्क राहुयात, यापुढे महाराष्ट्रावर आणि मराठीवर कुठल्याही पद्धतीने अन्याय होईल तेव्हा आपण एकत्र आलो पाहिजे." असं म्हणत तेजस्विनी पंडितने तिच्या भावना व्यक्त केल्या.