"मला बोलावलं तर मी...", 'बिग बॉस' मध्ये जाण्याबाबत सविता प्रभुणे काय म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 11:58 IST2025-10-04T11:50:04+5:302025-10-04T11:58:43+5:30
"मला बोलावलं तर मी...", 'बिग बॉस' मध्ये जाण्याबाबत सविता प्रभुणे यांनी व्यक्त केलं मत, म्हणाल्या...

"मला बोलावलं तर मी...", 'बिग बॉस' मध्ये जाण्याबाबत सविता प्रभुणे काय म्हणाल्या?
Savita Prabhune: मराठी कलाविश्वातील ९० चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे सविता प्रभुणे. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर सविता प्रभूणे यांनी अनेक गाजलेल्या हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'पवित्र रिश्ता' सारख्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारुन त्यांना प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. सध्या सविता प्रभुणे 'वडापाव' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी बिग बॉस मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली.
नुकतीच सविता प्रभुणे यांनी अमोल परचूरे यांच्या 'कॅचअप मराठी' ला मुलाखत दिली. त्यादरम्यान मुलाखतीमध्ये तुम्हाला कधी 'बिग बॉस'साठी विचारणा झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना सविता प्रभुणे म्हणाल्या, "मला आजवर कधी विचारणा झाली नाही. कारण, मी परखड बोलत नाही.खरंतर, पटकन उत्तर देणं मला अजिबात जमत नाही. पण,कदाचित मला बोलावलं तर मी जाईनही.. मला माहिती नाही काय होईल. माझ्यासाठीही तो एक वेगळा अनुभव असेल."
यानंतर मग पुढे त्या म्हणाल्या," एक प्रोजेक्ट म्हणून तिकडे जायचं काही दिवस राहायचं, ते पूर्ण करुन यायचं, शिवाय ते खूपच इंटरेस्टिंग असेल तर मला बिग बॉसमध्ये नक्की जायला आवडेल.कारण शेवटी प्रेक्षकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचायचं आहे हा हेतू आहेच." असं मत त्यांनी मुलाखतीमध्ये व्यक्त केलं.
दरम्यान, प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' चित्रपटात सविता प्रभुणेंनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. २ ॲाक्टोबर रोजी हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 'वडापाव' या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर यांच्याही भूमिका आहेत.