"ते म्हणाले ऑडिशन देशील का?" 'असा' सुरू झालेला रिंकूचा 'आर्ची' बनण्याचा प्रवास, नागराज मंजुळेंना म्हणालेली असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 12:26 IST2026-01-14T12:17:57+5:302026-01-14T12:26:09+5:30
रिंकु राजगुरुने सांगितला नागराज मंजुळेंसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा,म्हणाली-"देवा श्रीगणेशा गाण्यावर डान्स केला आणि..."

"ते म्हणाले ऑडिशन देशील का?" 'असा' सुरू झालेला रिंकूचा 'आर्ची' बनण्याचा प्रवास, नागराज मंजुळेंना म्हणालेली असं काही...
Rinku Rajguru: नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ हा चित्रपट २९ एप्रिल २०१६ रोजी प्रदर्शित झाला. मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात हा चित्रपट मैलाचा दगड ठरला.'सैराट'मधील आर्ची आणि परशाची लव्ह स्टोरी आजही प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. आपल्या करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून रिंकू (Rinku Rajguru)रातोरात स्टार झाली. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर रिंकूला अख्खा महाराष्ट्र ओळखू लागला. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सध्याच्या घडीला रिंकू मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री बनली आहे. सध्या रिंकु एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने 'सैराट'च्या ऑडिशनचा किस्सा शेअर केला आहे.
नुकतीच रिंकु राजगुरूने मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यादरम्यान, सैराटमधील तिची ऑडिशन आणि नागराज मंजुळेंसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा तिने शेअर केला. तिची ही मुलाखत सध्या व्हायरल होतेय. या मुलाखतीत रिंकूला विचारण्यात आलेला एक प्रश्न आणि त्यावरचं रिंकूचं उत्तर याची सर्वाधिक चर्चा होतेय.या मुलाखतीत रिंकू म्हणाली, मी त्यांना पहिल्यांदा अकलूजला ऑडिशन होती तिथे भेटले. एक राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आपल्या इथे येणार हे समजल्यावर मी त्यांना पाहायला गेले. मला काहीच कळत नव्हतं.तेव्हा मी अगदीच १३ वर्षांची होते.
त्यानंतर रिंकूने सांगितलं," माझ्या डोक्यात फक्त एकच होतं, आपल्या गावात कोणीतरी दिग्दर्शक आला आहे. मला त्यांना बघायचं आहे. मी त्यांना बघण्यासाठी अक्षरश: पायी चालत गेले. मम्मी मला म्हणाली की, अमुक एक ठिकाणी ऑडिशन आहे... तू जाऊन भेटे. मी ऑडिशनच्या ठिकाणी चालत गेले. तिथे एक कॅफे होता आणि मग खुर्चीवर बसले. त्यावेळी एका माणसाला मी विचारलं, कुठे आहेत नागराज मंजुळे? मला त्यांना भेटायचं आहे. तर ते म्हणाले 'तू ऑडिशन देशील का?' मी त्यांना म्हणाले, 'मला यातलं काहीच कळत नाही.' माझं ते बोलणं ऐकून त्यांनी विचारलं, 'तुला काय येतं?' मी म्हटलं, "मला देवा श्रीगणेशा गाण्यावर नाचायला येतं आणि मी त्यावर डान्स केला. इतकं ते सहज होतं." मात्र, हा माणूस दुसरा-तिसरा कोणी नव्हतं तर खुद्द नागराज मंजुळे होते. असा मजेशीर किस्सा रिंकूने सांगितला.