"मला एकटं राहायला आवडतं...", अभिनेत्री मुक्ता बर्वेचं वक्तव्य चर्चेत; लग्न अन् रिलेशनशिपबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 17:53 IST2025-11-23T17:46:01+5:302025-11-23T17:53:58+5:30
मराठी कलाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे सध्या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

"मला एकटं राहायला आवडतं...", अभिनेत्री मुक्ता बर्वेचं वक्तव्य चर्चेत; लग्न अन् रिलेशनशिपबद्दल म्हणाली...
Mukta Barve: मराठी कलाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. मुक्ताने आतापर्यंत अनेक सुपरहिट मालिका, नाटक व चित्रपटांमध्ये काम केले आहे.नुकताच मुक्ता बर्वेचा 'असंभव' हा मराठी सिनेमा रिलीज झाला आहे.सध्या सगळीकडे या सिनेमाची चर्चा सुरु आहे. याचनिमित्ताने अभिनेत्री वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसते आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिचे अनुभव कथन केले आहेत. त्याचबरोबर लग्नसंस्था आणि रिलेशनशिपबद्दल तिने प्रतिक्रिया दिली आहे.
नुकतीच मुक्ताने 'आरपार' ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, अभिनेत्रीला, “ पूर्वी लग्नाळू मुलांना, मुलगी त्यांच्यापेक्षा यशस्वी, अधिक पैसे कमावणारी, समाजात मोठं नाव असलेली नको वाटायची; कारण घरच्या घरी स्पर्धा होईल असं वाटतं, तुला कधी असे अनुभव आले का?” असं विचारलं. यावर मुक्ता म्हणाली,"नाही, मी लग्नच नाही केलं. रिलेशनशिपमध्ये अशा समस्या येत नाही. मला असं वाटतं हा सगळा गोंधळ लग्नसंस्थेत आहे आणि आता आहे की नाही मला माहीत नाही. कदाचित तसं नसावं. कारण, आता खूप लोकं वेगवेगळं काही शिकत असतात. शिक्षण झाल्यानंतर नोकरी सोडून आणखी काही शिकत असतात. असे अनेक प्रकार लोक करतात. तुम्ही कधी ब्रेक घेता, मग काही ठिकाणी एक पार्टनर कमवत असतो तर दुसरा त्याचा छंद जोपासतो. मग तो नोकरी करतो आणि दुसरा वेगळं काहीतरी करत असतो. हे व्यक्तीसापेक्ष आहे किंवा काही ठिकाणीच असं दृष्य असेल."
त्यानंतर मुक्ता पुढे म्हणाली,"पण, रिलेशनशिपमध्ये असताना किंवा मित्र-मैत्रीणींसोबत असताना मला अशा काही समस्या आल्या नाहीत की यशस्वी आहे किंवा काही काम करतेय म्हणून कोणी दुखावलंय वगैरे असं काही माझ्याबाबतीत झालं नाही."
एकटेपणाबद्दल मुक्ता काय म्हणाली?
हल्ली मुलं-मुली त्याच्या सोयीनुसार लग्न उशीरा करतात, किंवा तारुण्यात वेगवेगळ्या कारणांमुळे ते एकटे राहत असतात, तर हा एकटेपणा कधी सुखाचा असतो आणि कधी नसतो आणि त्याला सामोरं कसं जावं” असं विचारण्यात आलं, त्यावर आपली प्रतिक्रिया देत ती म्हणाली, “स्वभावावर आहे. मला एकटं राहायला आवडतं. मला माझी कंपनी खूप आवडते. म्हणजे एका वेळेनंतर मला माझा ड्रायव्हरही गाडीत नको वाटतो, इतकं मला एकटं राहायला आवडतं.म्हणजे कोणी जेवायला येणार आहे का वगैरे हा खेळ खेळून थोड्या वेळाने मला कंटाळा येतो. ते प्रत्येकाच्या स्वभावानुसार असेल असं मला वाटतं.त्यामुळे तरुण वयात म्हणा किंवा म्हातारपणात जर एकटेपणा तुम्हाला आवडत असेल तर त्याचे काही सकारात्मक किंवा नकारात्मक अशा काही गोष्टी मला तरी वाटत नाही आणि मी माझ्या कामात खूप गुंतलेली असते आणि ते करत असताना मला मजा येते, त्यामुळे असं काही अजून तरी मला जाणवलेलं नाही."
दिवसेंदिवस मी घराबाहेरही पडत नाही...
"मी अशा क्षेत्रात काम करते, जिथे खूप माणसं सतत बरोबर असतात आणि सगळ्यांनाच व्यक्त व्हायचं असतं आणि सगळ्यांचीच मतं असतात, त्यामुळे मला आवडतं एकट राहायला, मी ब्रेकही घेते, फिरायलाही जाते; वाचायला घेते, दिवसेंदिवस मी घराबाहेरही पडत नाही, सतत गप्पा मारत बसणं मला फार आवडत नाही. शिवाय दिवसदिवस मी घरात बसून वेब सीरिज, सिनेमे बघते. " असा खुलासा अभिनेत्रीने केला.