"काळ्या रंगाचा छाप पडला की...", अभिनेत्री चारुशीला साबळेंनी सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:43 IST2025-05-30T15:41:28+5:302025-05-30T15:43:02+5:30
"काळ्या रंगाचा छाप पडला की...", अभिनेत्री चारुशीला साबळेंनी सांगितलं इंडस्ट्रीतील भयाण वास्तव

"काळ्या रंगाचा छाप पडला की...", अभिनेत्री चारुशीला साबळेंनी सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव
Charusheela Sable : अभिनेत्री चारुशीला साबळे (Charusheela Sable) या एकेकाळी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. 'गंमत-जंमत', 'माहेरची साडी' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच त्यांनी बॉलिवूड अभिनेते अजित वच्छानी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्या इंडस्ट्रीपासून दुरावल्या गेल्या. त्यात आता चारुशीला साबळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी इंडस्ट्रीत कमबॅक करण्याची इच्छा व्यक्त केली.
शाहीर साबळे यांची मुलगी चारुशीला साबळे यांनी नुकतीच 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. त्याचबरोबर त्यांच्या मनातील खदखद देखील व्यक्त केली. शिवाय त्यांनी कधी रिजेक्शनचा सामना केला आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "मला कधी असा अनुभव आला नाही. कारण मला चित्रपटांच्या फार ऑफर्स आल्या नाहीत. एकतर 'गंमत-जंमत' करतानाच मी लग्न केलं. त्यामुळे तो एक माझ्या करिअरसाठी तोटा झाला. त्यानंतर वर्षभरातच मला मुलगी झाली आणि मला घरातूनच फारशी मदत नसल्यामुळे माझंही करिअरकडे दूर्लक्ष झालं. शिवाय अजित त्याच क्षेत्रात काम करत होता त्यामुळे मला सांगणं आणखी अवघड गेलं. तसेच आपले संस्कार असे असतात की, आपण लोकांकडे काम मागायला नाही जाऊ शकत. शिवाय गोड बोलून काम कसं करुन घ्यायचं हे मला जमत नाही."
पुढे चारुशीला साबळे म्हणाल्या, "मुळात माझ्या स्वभावात स्पष्टवक्तेपणा असल्यामुळे लोकं माझ्यापासून चार हात लांब राहतात. कारण लोकांना वाटतं ही ,स्पष्टच बोलते. माझ्या बाबतीत असं झालं की, अजित गेल्यानंतर मी आणखी तुटून गेले. शिवाय अनेकांना वाटायचं की हिला कामाची काय गरज आहे? माझ्या घरच्यांचं सुद्धा हेच म्हणणं होतं. त्यावेळी मला कोणीही प्रोत्साहन दिलं नाही. याचा परिणाम माझ्या करिअरवर झाला. तरीही मी काही लोकांसमोर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण मला समोरुन तशा काही ऑफर्स आल्या नाहीत."
काळ्या रंगाचा छाप पडला की...
"दुसरा एक मुद्दा म्हणजे त्याकाळात एकदा तुमच्यानर काळ्या रंगाचा छाप पडला की तुम्ही तसे रोल करता तर मग तुम्हाला तशा भूमिका ऑफर केल्या जातात. मग तुम्ही ते किती करणार? पण, मला तसे चांगले रोल कधीच ऑफर्स झाले नाहीत. त्यामुळे देखील खूप परिणाम झाला." असं म्हणत चारुशीला साबळे यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.