"लोक कारण नसताना नावं ठेवतात…"; सिनेइंडस्ट्रीतील संघर्ष अन् नेपोटिझमबद्दल अजिंक्य देव यांचं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:01 IST2025-11-27T17:55:41+5:302025-11-27T18:01:55+5:30
बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेइंडस्ट्री स्टारकिड हा एक चर्चेचा विषय बनला आहे.

"लोक कारण नसताना नावं ठेवतात…"; सिनेइंडस्ट्रीतील संघर्ष अन् नेपोटिझमबद्दल अजिंक्य देव यांचं भाष्य
Ajinkya Deo: बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेइंडस्ट्री स्टारकिड हा एक चर्चेचा विषय बनला आहे. आजवर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांच्या मुलांनी मनोरंजन विश्वात पाऊल टाकलं आहे. त्यातील एक नाव म्हणजे अजिंक्य देव. अनेकदा स्टार किड्सना आई-वडिलांमुळे काम दिलं जातं असा अनेकांचा समज आहे. यावर अजिंक्य देव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठीतील एक प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य देव यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. अजिंक्य देव हे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे सुपुत्र आहेत. मराठीसह हिंदी इंडस्ट्रीतही त्यांनी खूप काम केलं आहे. त्यामुळे इंडस्ट्रीतील अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत.
नुकतीच अजिंक्य देव यांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली. यादरम्यान, त्यांनी आपल्या स्ट्रगलबाबत वक्तव्य केलं आहे. शिवाय स्टार किड असल्याचा आपल्याला फायदा नाही, नुकसानचं झालं असं त्यांनी सांगितलं.ते म्हणाले, "मला वाटतं कारण नसतानाच हे वादळ निघालं आहे की इंडस्ट्रीत नेपोटिझम आहे. पण, नेपोकिड्सना सगळ्यात जास्त स्ट्रगल करावा लागतो. आम्हाला जे काही सहन करावं लागतं त्याबद्दल कोणालाच माहिती नसतं. मी आयुष्यात खूप संघर्ष केला आणि आजही करतोय. माझ्या आई-वडिलांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांच्या पाठीशी कोणाचं नाव नव्हतं. आणि त्यांनी वलय निर्माण केलं. त्या वलयात मी कुठेतरी हरवलो.आजही मी घराबाहेर प़डलो की लोक म्हणतात रमेश देव यांचा मुलगा आला. मला त्यात कुठेही वावगं वाटत नाही.उलट मला याचा अभिमान वाटतो."
पुढे ते म्हणाले," जसं माझा भाऊ अभिनय दिग्दर्शन क्षेत्रात गेला.पण, त्याला नेपोटिझमचा जास्त फटका बसला नाही. तो अभिनय क्षेत्रापासून दूर होता. तो जरी आमच्याच क्षेत्रात असला तरी त्याने जाहिरात क्षेत्रापासून सुरुवात केली. पण, हिंदी असो किंवा मराठी मला वारंवार स्वत:ला सिद्ध करावं लागलं. आजही मला तेच करावं लागत आहे. जे लोकांना दिसत नाही,कारण नसताना ते नावं ठेवतात. अरे तुम्हाला तर सगळं आरामात भेटतं असं म्हणतात.तर तसं नसतं. आम्हाला काहीच आरामात मिळत नाही, त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात." असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.