डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
By कोमल खांबे | Updated: June 23, 2025 11:16 IST2025-06-23T11:15:25+5:302025-06-23T11:16:23+5:30
Sayali Sanjeev Pandharpur Wari 2025: मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवही वारीत सहभागी झाली होती. अभिनेत्रीने डोक्यावर विठुमाऊलीची मूर्ती घेत पायी वारी केली.

डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
आषाढी एकादशी पंढरपूर वारीची महाराष्ट्रात परंपरा आहे. दरवर्षी लाखो वारकरी वारीत सहभागी होतात. देहू , आळंदी येथून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पालखीतून पंढरपुरात दाखल होतात. हा संपूर्ण प्रवास वारकरी पायी चालत करतात. वारीचा संपूर्ण सोहळा हा नयनरम्य असतो. अनेक सेलिब्रिटीही दरवर्षी वारीमध्ये सहभागी होताना दिसतात.
यंदाही काही सेलिब्रिटी वारीत सहभागी झाले आहेत. मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवही (Sayali Sanjeev) वारीत सहभागी झाली होती. अभिनेत्रीने डोक्यावर विठुमाऊलीची मूर्ती घेत पायी वारी केली. याचा व्हिडिओ सायलीने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. "तुझ्या श्रद्धेची सावली, माथा टेकिन माऊली", असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे.
सायलीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसोबत फुगडी घालताना दिसत आहे. "संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा", असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे. सायलीने वारीत सहभागी होत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेतलं.
दरम्यान, 'काहे दिया परदेस' मालिकेतून सायली घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय 'झिम्मा', 'बस्ता', 'मन फकिरा', 'हर हर महादेव' या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. 'शुभमंगल ऑनलाइन' या मालिकेतही सायली दिसली होती.