"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 19:15 IST2025-10-31T19:14:37+5:302025-10-31T19:15:39+5:30
"रोहित आर्यासोबत मी ९ मिनिटं फोनवर बोलले होते...", नक्की काय चर्चा झाली? रुचिताने सगळंच सांगितलं

"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
मुंबईतील पवई येथील 'आर ए स्टुडिओ' मध्ये काही मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या. काल त्याने केलेल्या या प्रकारानंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यूही झाला. या घटनेनंतर रोहित आर्यासंबंधी अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्याने केलेला हा संपूर्ण प्रकार एखाद्या सिनेमासारखाच होता. धक्कादायक म्हणजे रोहित आर्याने मराठी अभिनेत्री रुचिता जाधवला हाच प्रकार एक सिनेमाचा सीन म्हणून सांगितला होता आणि तिला सिनेमाची ऑफरही दिली होती. रोहित आर्याची बातमी पाहिल्यानंतर रुचिताला मोठा धक्का बसला. ती नक्की काय म्हणाली वाचा
'लोकमत मुंबईला'ला दिलेल्या मुलाखतीत रुचिता जाधव म्हणाली, "त्याने मला ४ ऑक्टोबरला प्रोजेक्टसंदर्भात चर्चा करायची म्हणून मेसेज केला होता. आम्ही फोनवर बोलू असं ठरवलं. अर्ध्या तासात फोन करतो असं तो म्हणाला. फ्री झाल्यावर फोन कर असं मी त्याला म्हटलं. मग त्याने मला फ्री झाल्यावर मेसेज केला. मी त्याला फोन केला. आम्ही ९ मिनिटं बोललो आणि त्याने मला सिनेमाबद्दल सांगितलं. त्याने मला जो काही सीन सांगितला तो तसाच सीन त्याने पवईमध्ये केला. एक व्यक्ती असतो जो प्रचंड निष्पाप आणि सर्वसामान्य असतो. त्याला आपलं म्हणणं मांडायचं असतं पण त्याचं कोणीच ऐकत नसतं. मी त्याला यात माझी भूमिका काय असणार असं विचारलं. तर तो मला म्हणाला की एक तर शिक्षिका जी किडनॅप होते किंवा मग एखाद्या मुलाची आई. मला ती स्टोरी आवडली होती. त्याने मला नसीरुद्दीन शाहच्या सिनेमाचं उदाहरणही दिलं होतं. जेव्हा असा काही प्रोजेक्ट मिळतो तेव्हा आपणही प्रभावित होतो. मी त्याला लवकरच सांगते असं म्हटलं. त्याने मला हेही सांगितलं की आपण भेटूनही चर्चा करुया. मी काही मुलांनाही ऑडिशनला बोलवतोय तर तिथे तू ये, तुझंही बघणं होईल. मला हे सगळं खरंच वाटलं."
ती पुढे म्हणाली, "नंतर त्याने मला २३ ऑक्टोबरला मेसेज केला की २७ ते २९ ऑक्टोबरमध्ये कोणत्या तारखेला तुला यायला जमेल. मी त्याला २८ तारीख सांगितलं. सोमवारी त्याने मला मेसेज केला की, 'उद्या तू किती वाजता पोहोचणार आहेस?' आणि त्याने मला पवईच्या 'आरए स्टुडिओ'चं लोकेशनही पाठवलं. मी त्याला म्हटलं की माझे सासरे अचानक आजारी पडले आहेत. आम्हाला त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. त्यामुळे मला यायला जमणार नाही. आपण १५ नोव्हेंबरनंतर बघू. मग त्यावर त्याचा मला ओके, नो प्रॉब्लेम, टेक केअर असा मेसेज केला."
काही वर्षांपूर्वीच झाली होती रोहित आर्याशी भेट
"२०१० साली मी त्याला एकदा स्टुडिओमध्ये भेटले होते. पण तेव्हाचीच ओळख होती. आम्ही एकमेकांचा नंबरही घेतलेला. पण नंतर कधी भेट झाली नाही. मी खूप प्रोफेशनल आहे मी उगाच कोणाला मेसेज करत नाही. पहिल्यांदा त्याने मला प्रोजेक्टसाठी मेसेज केला. त्यामुळे कोणी काही ऑफर केलं की गोष्ट काय, भूमिका काय हे आपण ऐकतो तसंच मी ते ऐकलं. पण जेव्हा मी ती बातमी पाहिली तेव्हा मी शॉक झाले. तेव्हा मला वाटलं की हा पब्लिसिटी स्टंट असेल. बरं झालं मी कुटुंबाला प्राधान्य दिलं आणि मी तिथे गेले नाही. नशीब मी वाचले."
