रविंद्र बेर्डेंच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंची भावूक पोस्ट; म्हणाल्या, 'शेवटच्या क्षणीही..'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 11:46 AM2023-12-14T11:46:37+5:302023-12-14T11:47:22+5:30

Prreeya berde: रविंद्र बेर्डे हे प्रिया यांना लहान बहीण मानायचे. त्यामुळेच रविंद्र यांच्या निधनामुळे प्रिया बेर्डे प्रचंड भावूक झाल्या आहेत.

marathi-actress-prreeya-berde-shared-emotinol-post-for-late-actor-ravindra | रविंद्र बेर्डेंच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंची भावूक पोस्ट; म्हणाल्या, 'शेवटच्या क्षणीही..'

रविंद्र बेर्डेंच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंची भावूक पोस्ट; म्हणाल्या, 'शेवटच्या क्षणीही..'

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेता रविंद्र बेर्डे (ravindra berde) यांचं नुकतंच निधन झालं आहे.  वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde) यांचे थोरले बंधू असलेल्या रविंद्र बेर्डे यांना घशाच्या कर्करोग झाला होता. त्यामुळे  गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, या सगळ्या आजारपणामुळे अखेर त्यांचं निधन झालं. रविंद्र बेर्डे यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बदला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्येच अभिनेत्री प्रिया बेर्डे (prreeya berde) यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रिया बेर्डे आणि रविंद्र बेर्डे यांच्यात दीर आणि भावजय हे नातं होतं. मात्र, रविंद्र बेर्डे यांनी कायम प्रिया यांना बहिणीप्रमाणेच वागवलं. त्यामुळे दीर असूनही ते कायम भावासारखे राहिले असं प्रिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इतकंच नाही तर घरचा कर्तापुरुष गेला असं म्हणत दु:खही व्यक्त केलं आहे.

काय आहे प्रिया बेर्डेंची पोस्ट?

''दादा गेले... खरं तर नात्याने मोठे दीर पण होते वडिलांसारखे, दादा आणि वृषाली वहिनी नेहमीच माझ्या पाठीशी आईवडिलांसारखे उभे होते, मला सख्खा भाऊ नाही एका भाऊबीजेला मला म्हणाले, ती आरती घे आणि ओवाळ मला तेव्हापासून भाऊबीज , रक्षाबंधन न चुकता होऊ लागले. ती कमी पण त्यांनी पुरी केली आणि फक्त ते सण साजरे करून नाही तर खऱ्या अर्थाने माझ्या पाठीशी उभे राहून..  दादा आमच्या संपूर्ण बेर्डे कुटुंबाचे आधारस्तंभ होते घरातला जेष्ठ व कर्ता माणूस, ते तसे फार कमी बोलत पण आमच्यात वेगळं बॉंडिंग होतं. अभिनय आणि स्वानंदी तर त्यांच्या मुलांपेक्षा ही प्रिय होते, आणि मुलांचं ही त्यांच्यावर जगावेगळं प्रेम, लहानपणापासून त्यांची सगळी हौसमौज दादांनी अगदी कौतुकाने पुरवली. सगळ्या घरात होतात तशी आमच्यात पण भांडणं, मतभेद होतात पण या सगळयात ते कधीच पडले नाहीत. बायकांच्या गोष्टीत न पडता अलिप्त राहून त्यांनी सगळ्यांना बांधून ठेवलं त्यांच्या धाक, दरारा हा अबोल होता पण तो जाणवेल इतपत होता. घरातला कर्तापुरुष कसा असावा याचं दादा उत्तम उदाहरण होते", असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "मागच्या महिन्यात आम्ही सगळे बेर्डे कुटुंब गोव्याला गेलो होतो अनेक वर्षांनी तो योग जुळून आला होता पण दादांची तब्येत नेमकी बिघडली ट्रिप कॅन्सल करावी असा विचार आम्ही करत होतो पण दादा ठाम राहिले की मला मुलांबरोबर यायचंय आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ते आले आणि समाधानी होऊन परतले.. शेवटच्या क्षणीही त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होतं. आयुष्यच सार्थक झाल्याचं समाधान जे फार कमी लोकांच्या नशिबी असतं.. दादा तुम्हाला मनःपूर्वक श्रद्धांजली.

Web Title: marathi-actress-prreeya-berde-shared-emotinol-post-for-late-actor-ravindra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.