'कलरफूल' हे नाव पूजा सावंतला कसं पडलं? अभिनेत्रीने स्वत:च सांगितला किस्सा, 'दगडी चाळ' सिनेमाशी कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 17:46 IST2026-04-10T17:38:34+5:302026-04-10T17:46:03+5:30
'कलरफूल' हे नाव पूजा सावंतला कसं पडलं ? 'दगडी चाळ' सिनेमाशी आहे कनेक्शन

'कलरफूल' हे नाव पूजा सावंतला कसं पडलं? अभिनेत्रीने स्वत:च सांगितला किस्सा, 'दगडी चाळ' सिनेमाशी कनेक्शन
Pooja Sawant: 'महाराष्ट्राची कलरफूल' अभिनेत्री म्हणून अभिनेत्री पूजा सावंतला ओखळलं जातं. पूजाने आजवर असंख्य मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील झळकून आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. सध्या पूजा 'सालबर्डी' या तिच्या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात पूजाने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. येत्या १७ एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या पूजा या चित्रपटाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसते आहे. अशातच आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे ती चर्चेत आली आहे.
अलिकडेच पूजा सावंतने 'नवशक्ती' ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, तिने दगडी चाळ सिनेमाच्या आठवणी तसेच तिला 'कलरफूल अभिनेत्री' हे नाव कसं पडलं? यामागचा मजेशीर किस्सा शेअर केला. अभिनेत्री म्हणाली, "मी याचं संपूर्ण श्रेय प्रेक्षक तसेच अंकुश सर आणि चंद्रकांत सर यांना देईन. कारण, कलरफूल हे नाव त्यांनी मला दिलं. आणि महाराष्ट्रातील जनतेनं ते नाव मोठं केलं. आता मला लोक कलरफूल या नावाने ओळखतात. त्यामुळे मला असं वाटतं आयुष्यभर प्रेक्षकांनी या मला याच नावाने ओळखावं."
त्यानंतर पूजा 'दगडी चाळ' सिनेमाच्या आठवणी शेअर करत म्हणाली, "दगडी चाळ हा प्रेक्षकांनी मोठा केलेला सिनेमा आहे. त्यातील सूर्याचं पात्र तसेच कलरफूल अभिनेत्रीला प्रेक्षकांनी मोठं केलंय. तेव्हा आम्ही काळा चौकीतील खऱ्यखुऱ्या चाळीत शूट केलं होतं. मी साकारलेलं पात्र आणि सूर्या एकाच चाळीत राहत असतात. चाळीतली जी प्रेमकथा आहे ती सिनेमात दाखवली गेली. म्हणजे आपल्याला एकमेकांच्या वेळा माहित असतात. अरे... ही या वेळेत क्लासमधून येते आणि तो बरोबर तेव्हा बाल्कनीत उभा असतो. त्या गोष्टी मला खूप जवळून अनुभवता आलं. त्यातील प्रत्येक सीन खूपच छान होता. आजही तुम्ही मन धागा धागा... गाणे पाहिले तर, ओले केस वाळवत मी घराबाहेर येते. तिथे सूर्या उभा असतो आणि तो तिला खुणावत सांगतो की तुझी बट छान दिसते. तिला तिथे राग येतो पण घरी गेल्यावर आरशात ती बट पाहून हसते."
त्यानंतर मी रंगपंचमी मनापासून खेळायला लागले...
"यापूर्वी मी रंगपंचमी कधीच खेळले नाही. कारण,मला रंग खेळणं आवडायचं नाही. तेव्हा शूटच्या दिवशी मी अंकुश सरांना सांगितलं होतं की सर... मला जरा कमी रंग लावा. कारण, मी रंग खेळत नाही. हेच माझं चुकलं. त्यावेळी मला खूप रंग लावण्यात आला. त्याक्षणी कलरफूल हे नाव सूचलं. ते स्क्रिप्टमध्ये नव्हतं. अंकुश सर आणि चंद्रकांत सरांनी ते नाव ठरवलं, इतक्या नकळतपणे आलेलं ते नाव आहे. त्यानंतर मी रंगपंचमी अगदी मनापासून खेळायला लागले." असा खास किस्सा पूजाने शेअर केला.