"मी जीव ओतून काम केलं, पण...", 'झापुक झुपूक'ला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल दिपाली पानसरे काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:11 IST2025-06-17T12:07:54+5:302025-06-17T12:11:24+5:30
"मी जीव ओतून काम केलं, पण...", 'झापुक झुपूक' ला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल दिपाली पानसरेचं वक्तव्य

"मी जीव ओतून काम केलं, पण...", 'झापुक झुपूक'ला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल दिपाली पानसरे काय म्हणाली?
Deepali Pansare: 'बिग बॉस मराठी'फेम सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला झापुक झुपूक हा सिनेमा अलिकडेच २५ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला होता. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याची सगळीकडे चर्चा होती. परंतु,सूरज चव्हाणच्या या चित्रपटाबद्दल टीझर व ट्रेलरनंतर लोकांमध्ये जेवढी क्रेझ पाहायला मिळत होती, तेवढी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर दिसली नाही. त्यावर आता या चित्रपटात झळकलेली मराठी अभिनेत्री दिपाली पानसरेने भाष्य केलं आहे.
नुकतीच दिपाली पानसरेने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला झापुक झुपूक चित्रपटापला प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रतिसादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना अभिनेत्री म्हणाली, "खरं सांगायचं झालं तर मी चित्रपटात खूप जीव ओतून काम केलं. कारण, त्यावेळी मी माझं प्रत्येक शूट मॅनेज करत होते. त्यात मी 'झनक' मालिका सोडली. पण, मला असं वाटत ती एक डेस्टनी होती. ते व्हायचं होतं म्हणून ते झालं. खरंतर चित्रपट खूप छान होता. ज्यांनी चित्रपट पाहिला त्यांना खूप मजा आली. लहान मुलांनी अगदीच माझा मुलगा रुहानला मराठी येत नसतानाही त्याने चित्रपट एन्जॉय केला. आता चित्रपटाच्या रिव्ह्यूजमुळे किंवा एक दिवस आधी पहलगाम हल्ला झाला होता. त्यामुळे चित्रपटावर परिणाम झाला असावा, हे ठोस सांगता येत नाही. पण, मी मेहनत केली होती, जीव ओतून काम केलं होतं."
त्यानंतर पुढे दिपाली चित्रपटातील पात्राविषयी सांगताना म्हणाली,"बऱ्याच लोकांचं असं होतं की माझं पात्र कोणीतरी दुसऱ्याने डबिंग केलं आहे, असं त्यांना वाटत होतं. ते मी माझं पात्र बनवलं होतं. मला कोणी सांगितलं नव्हतं की तू असं बोल. मी जे शिकले होते की, ती बाई जसा डायलॉग बोलते, मी त्या हिशोबाने त्या कॅरेक्टरला पकडलं होतं. पण, तुम्ही जो विचार करता तो समोरच्यापर्यंत पोहोचतो की नाही, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. चित्रपट वर्क झाला नाही, मात्र खूप छान बॉण्डिंग झाली. शिवाय केदार सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली. जिथे मी मॉनिटरवर जरी बसले तरी खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणून मला त्याचं फार वाईट वाटलं नाही." असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून नावारुपाला आलेला हा बारामतीचा पठ्ठ्या प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर दिसला. या सिनेमात सूरज चव्हाणसह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली.