"कबुतरांमुळे सगळ्याच समाजाला त्रास...", विद्याधर जोशींचं स्पष्ट मत, म्हणाले-"सगळीच परिस्थिती कठीण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:44 IST2025-10-09T11:31:07+5:302025-10-09T11:44:04+5:30
"मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाचं फुफ्फुस...", विद्याधर जोशींची प्रतिक्रिया, कबुतरखान्यांबद्दल व्यक्त केलं मत

"कबुतरांमुळे सगळ्याच समाजाला त्रास...", विद्याधर जोशींचं स्पष्ट मत, म्हणाले-"सगळीच परिस्थिती कठीण..."
Vidyadhar Joshi: अलिकडच्या काळात मुंबईतीलकबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. सुप्रीम कोर्टासह मुंबई हायकोर्टाने कबुतरखान्यांवर बंदी घातली. त्यामुळे प्राणी प्रेमींमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. या प्रकरणी अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. अशातच लोकप्रिय अभिनेते विद्याधर जोशी यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर, कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे श्वसनांचे आजार होत असल्याच्या गंभीर मुद्दावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
नुकतीच विद्याधर जोशी यांना अमोल परचुरेंच्या कॅचअप मराठीला मुलाखत दिली.त्यादरम्यान, दादरच्या कबुतर खाने किंवा कबुतरांमुळे काय त्रास होऊ शकतो. याबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. तेव्हा ते म्हणाले," कबुतरखाने,कबुतर असो किंवा त्यांच्या विष्ठा म्हणा त्यांच्यामुळे फुफ्फुसाचा मोठा रोग होऊ शकतो. सगळ्यांनाच माझ्या इतका त्रास होईल, असं नाही. पण, मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं फुफ्फुस हे काही प्रमाणात विकच आहे, हे सगळ्यांनीच समजून घेतलं पाहिजे."
या मुलाखतीमध्ये पुढे ते म्हणाले, "मला एक गोष्ट कळत नाही की, तुम्हाला माहितीये कबुतरांमुळे सगळ्याच समाजाला त्रास होणार आहे. हे माहीत असूनही त्याला तुम्ही कसा पाठिंबा कसा देऊ शकता. यामध्ये कुठलीही जात, धर्म, पंथ, लिंग आणि तुमचा पेशा याचा काहीही संबंध नाही. यामुळे सगळ्यांनाच त्रास होणार आहे. आता मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही.पण, ही माणसं डोक्यावर पडली आहेत का अशा वेळी भयंकर अस्वस्थ होतो. यामुळे तुम्ही सगळ्या समाजाची वाट लावत आहात."
सगळीच परिस्थिती कठीण आहे, कारण...
"आता शहराच्या बाहेर नॅशनल पार्कमध्ये कबुतरखाने जातील, असं मी वाचलं. पण, सध्याची एकंदरीत विकासाची गती पाहता नॅशनल पार्कमध्येसुद्धा हे शहर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळीच परिस्थिती कठीण आहे.मोठ-मोठे तज्ज्ञ, डॉक्टर याबद्दल सांगतायेत तरी तुम्ही ऐकत नाही." असं मत विद्याधर जोशींनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केलं.