सिद्धार्थ जाधव ४१ कोटी संपत्तीचा मालक आहे? अभिनेता म्हणाला- "माझ्या संपूर्ण कारकीर्दीत..."
By देवेंद्र जाधव | Updated: March 20, 2025 10:49 IST2025-03-20T10:49:00+5:302025-03-20T10:49:57+5:30
सिद्धार्थ जाधवकडे खरंच ४१ कोटींची संपत्ती आहे असा प्रश्न त्याला विचारला असता अभिनेत्याने दिलेलं उत्तर चर्चेत आहे

सिद्धार्थ जाधव ४१ कोटी संपत्तीचा मालक आहे? अभिनेता म्हणाला- "माझ्या संपूर्ण कारकीर्दीत..."
मराठीसह बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीही गाजवणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. मेहनतीच्या जोरावर आज सिद्धार्थ (siddharth jadhav) एक लोकप्रिय अभिनेता आहे. सिद्धार्थ सध्या विविध विषयांवरील सिनेमांमध्ये अभिनय करत आहे. याशिवाय 'आता होऊ दे धिंगाणा' या शोमधून सिद्धार्थ टेलिव्हिजन इंडस्ट्रीही गाजवत आहे. अशातच सिद्धार्थकडे ४१ कोटींची संपत्ती आहे, अशा चर्चांना उधाण आले होते. अखेर याविषयी अभिनेत्याने मौन सोडलंय.
सिद्धार्थकडे खरंच ४१ कोटींची संपत्ती आहे?
कॅचअप या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थला याविषयी प्रश्न विचारला असता तो म्हणाला, "मी माझ्या पूर्ण कारकीर्दीत ४१ कोटी कोट्या केल्या असतील. मला आनंद झाला वाचून की, एवढं आहे आपल्याकडे." असं सिद्धार्थ गंमतीत म्हणाला. पुढे अभिनेता म्हणाला की, "मी इतक्या वर्षांमध्ये कमावलंय ते ४१ कोटींच्या पलीकडचं आहे. आकड्यांवरची संपत्ती मलाही माहित नाही पण आता कुठेतरी स्टेबल झालोय."
"मुंबईत शिवडीला आलो तेव्हा भाड्याच्या घरात राहत होतो. तेव्हा आई-बाबांसाठी घर घ्यायचं स्वप्न होतं. जे मी २६ वर्षांनी पूर्ण केलं. ज्या लालबाग-शिवडीच्या विभागात मी लहानाचा मोठा झालो त्या एरियात मी छान घर घेऊ शकलो."
"जगण्यासाठी बेसिक गोष्टी लागतात त्या मी सेटल करु शकलो. माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद आहेच. त्यांना हक्काच्या घरात सेटल होताना बघणं ही माझ्यासाठी १०० कोटींची फीलिंग आहे. भाड्याच्या घरात राहताना मी पप्पांच्या नावाची नेमप्लेट लावली होती. तेव्हा भाड्याच्या घरात भाडेकरुची नेमप्लेट लावत नाहीत, हे मला माहित नव्हतं. त्यामुळे आता हक्काच्या घरात आई-बाबांच्या नावाची छान नेमप्लेट लावली आहे. आता माझ्याकडे इतकी संपत्ती आहे ही बातमी कोटी आहे की खोटी आहे मला माहित नाही."