अभिनेता संजय शेजवळने या अभिनेत्रीसोबत केला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 18:24 IST2019-03-04T18:15:45+5:302019-03-04T18:24:14+5:30
संजय शेजवळने आजवर खूपच मराठी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याने सगळ्याच प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत आणि या त्याच्या भूमिकांचे प्रेक्षकांनी कौतुकदेखील केलेले आहे.

अभिनेता संजय शेजवळने या अभिनेत्रीसोबत केला साखरपुडा
मराठी हिंदी चित्रपटसृष्टीत लग्नाचा मौसम आला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. गेल्या काही महिन्यात अनेक सेलिब्रेटी लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. बॉलिवूडमध्ये दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा यांसारख्या सेलिब्रेटींची लग्न झाली तर मराठीत वरद चव्हाण नुकताच लग्नबंधनात अडकला. आता त्याच्यानंतर आणखी एका मराठी अभिनेत्याचा साखरपुडा झाला आहे.
संजय शेजवळने आजवर खूपच मराठी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याने सगळ्याच प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत आणि या त्याच्या भूमिकांचे प्रेक्षकांनी कौतुकदेखील केलेले आहे. लक्ष्मी... तुझ्याविना या चित्रपटात त्याने काम केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत प्रेमा किरण, सई रानडे झळकले होते. तसेच सौभाग्य माझे दैवत, प्रेम पहिलं वाहिलं या चित्रपटातही त्याने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच ताटवा या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकला होता. त्याच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. त्याचा नुकताच साखरपुडा झाला असून त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना बातमी दिली आहे.
संजयने एका अभिनेत्रीसोबत साखरपुडा केला असून या अभिनेत्रीने देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सई कल्याणकर असे या अभिनेत्रीचे नाव असून ती भेटी लागी जीवा या मालिकेत झळकली होती. गणपती बाप्पा मोरया या मालिकेत देखील तिने काम केले आहे. त्या दोघांचा साखरपुडा २ मार्चला झाला असून त्यांच्या साखरपुड्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या त्यांच्या फोटोला त्यांचे फॅन्स भरभरून लाईक्स देत आहेत आणि या फोटोंना खूप साऱ्या प्रतिक्रिया देखील मिळत आहेत.
संजयने त्याच्या साखरपुड्यात शेरवानी घातला होता तर सईने सुंदरशी साडी घातली होती. ते दोघेही साखरपुड्यात खूपच छान दिसत होते. त्यांच्या चाहत्यांनी या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांचे कपल खूपच छान असल्याचे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे असून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.