"मी वयाच्या ७ व्या वर्षी ठरवलं की मला दिग्दर्शक बनायचंय.."; सचिन पिळगावकरांचं विधान चर्चेत
By देवेंद्र जाधव | Updated: June 27, 2025 14:19 IST2025-06-27T14:18:23+5:302025-06-27T14:19:53+5:30
सचिन पिळगावकरांनी वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी दिग्दर्शक व्हायचं ठरवलं होतं. यामागचा खास किस्सा नक्की वाचा

"मी वयाच्या ७ व्या वर्षी ठरवलं की मला दिग्दर्शक बनायचंय.."; सचिन पिळगावकरांचं विधान चर्चेत
सचिन पिळगावकर हे अभिनेते म्हणून लोकप्रिय आहेतच. पण दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी मराठी सिनेसृष्टीला सुपरहिट सिनेमे दिले आहेत. सचिन पिळगावकरांनी वयाच्या ७ व्या वर्षी दिग्दर्शक होण्याचा निर्णय घेतला होता. अथर्व सुदामेला दिलेल्या मुलाखतीत सचिन यांनी हा किस्सा सांगितला. सचिन म्हणाले, "ज्या वयात मी काम सुरु केलं त्या वयात मला दुपारी २ तास झोपायला मिळायचं. त्यामुळे मला भरपूर स्वप्न पाहण्याची संधी होती. खूप काळ मला दुपारी झोपायला मिळायचं. भरपूर स्वप्न पाहिली."
"पण एक स्वप्न मी अभिनेता बनल्यावर पाहिलं. ते म्हणजे वयाच्या ७ व्या वर्षी मी ठरवलं, मला दिग्दर्शक बनायचंय. आवड तर होतीच. मी सिटीलाईट सिनेमाच्या बाजूला राहायचो. माझं लहानपण तिथे गेलं. माझा जन्मही तिथलाच. आमच्याजवळ सिटिलाईट सिनेमा होता तिथे मला कळलं की, कागज के फूल हा सिनेमा लागलाय. त्याआधी प्यासा सिनेमा पाहिला होता मी. तो मला आवडला होता. गुरुदत्तजींचा मी एक फॅन झालो होतो."
"त्यादिवशी मला काही काम नव्हतं. पप्पा बाहेर गेले होते. आई आणि मी आम्ही दोघेच घरी होतो. तेव्हा मी आईला, कागज के फूल बघायला जाऊ का, असं विचारलं. तिने पैसे दिले मला तिकिटाचे. मी गेलो तिकिट काढलं. पिक्चर पाहायला सुरुवात केली आणि गुंग झालो. इंटरव्हलमध्ये मी थंड, वेफर वगैरे काही खाल्लं नाही. तसाच बसून होतो. पिक्चर संपल्यावर ६ वाजता बाहेर निघालो. मनात त्या पिक्चरचा विचार करत होतो. परत एकदा बघू या का, असा विचार आला. काही खाल्लं नसल्याने खिशात पैसे होते. मी गेलो, तिकिट विकत घेतलं आणि ६ चा शो परत बघितला."
"सिटिलाईटवरुन घरी येताना मी घाबरलो. कारण घरात मी ६ चा शो बघणार असं काही सांगितलं नव्हतं. ग्राऊंड फ्लोअरला राहत होतो. घराच्या बाहेर पप्पा उभे होते. मला घाम फुटला. मी पप्पांजवळ गेलो. काय रे, कुठे गेला होतास, ३ चा शो होता ना.. असं पप्पा म्हणाले. मला आवडला म्हणून ३ नंतर ६ चा शो परत बघितला, असं त्यांना सांगितलं. याशिवाय माझ्या खिशातली तिकिटं त्यांना दाखवली. ९ चा शो पण बघणार का? असं पप्पांनी मला विचारलं. मी हो म्हणालो. मग आम्ही दोघांनी हा चित्रपट पाहिला. "
"रात्री १२ वाजता हा सिनेमा पाहून घरी येताना बाबांनी विचारलं, तीनदा सलग तू हा चित्रपट पाहिलास. तुला एवढं काय आवडलं? मला विचार वेगळे आले पण तिसऱ्यांदा सिनेमा बघताना मी ठरवलंच की, मला दिग्दर्शक व्हायचंय. ७ वर्षांचा असून तू हे ठरवत आहेस, असं बाबांनी विचारलं. मी म्हटलं, हो.. ठरवलं. यात काही बदल होणार नाही. तर ते एक स्वप्न. मी बघितलं, ठरवलं आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं." हा खास किस्सा सचिन यांनी सांगितला.