शुभविवाह संपन्न! प्रथमेश परब-क्षितीजा अडकले लग्नाच्या बेडीत, फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 15:04 IST2024-02-24T15:03:55+5:302024-02-24T15:04:35+5:30
Prathamesh Parab Wedding : दगडूची नवी इनिंग! क्षितीजासोबत प्रथमेशने बांधली लग्नगाठ

शुभविवाह संपन्न! प्रथमेश परब-क्षितीजा अडकले लग्नाच्या बेडीत, फोटो समोर
मराठी कलाविश्वात सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक सेलिब्रिटी बोहल्यावर चढत आहेत. 'टाइमपास' सिनेमातून घराघरात पोहोचलेल्या प्रथमेश परबची गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरू होती. आता अखेर प्रथमेश गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत विवाहबंधनात अडकला आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रथमेश आणि क्षितीजाचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नातील खास क्षणांचे फोटो समोर आले आहेत.
प्रथमेशने लग्नाचे फोटो त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. लग्नासाठी प्रथमेशने गुलाबी रंगाचं धोतर, पांढरा कुर्ता आणि फेटा असा पारंपरिक लूक केला होता. तर क्षितीजा पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत नटली होती. डोक्यावर अक्षता पडताच त्या दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत सात फेरे घेत प्रथमेश आणि क्षितीजा लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीच १४ फेब्रुवारीला प्रथमेश आणि क्षितीजाने साखरपुडा केला होता. नव्या सुरुवातीसाठी त्यांना चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
काही वर्ष डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितीजाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दगडूला खऱ्या आयुष्यातील प्राजू मिळाल्याने चाहतेही खूश आहेत. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रथमेशने क्षितीजावरील प्रेमाची कबुली दिली होती. प्रथमेश आणि क्षितीजा अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.