Hemangi Kavi: “हा टिंगल-टवाळीचा…” विधवांच्या ‘गंगा भागिरथी’ उल्लेखावर अभिनेत्री हेमांगी कवीची संतप्त पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 17:42 IST2023-04-14T17:41:17+5:302023-04-14T17:42:26+5:30
Hemangi Kavi : ‘गंगा भागिरथी’ या शब्दामुळे खरंच विधवा स्त्रियांचा सन्मान वाढेल का?, असा प्रश्न विचारला जातोय. आता मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिनेही यावर आपलं मत मांडलं आहे.

Hemangi Kavi: “हा टिंगल-टवाळीचा…” विधवांच्या ‘गंगा भागिरथी’ उल्लेखावर अभिनेत्री हेमांगी कवीची संतप्त पोस्ट
राज्यभरातील विधवा महिलांना सन्मान मिळण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार, विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा हा शब्द न वापरता त्याऐवजी ‘गंगा भागिरथी’ या शब्दाचा वापर करावा असा प्रस्ताव तयार केला जात आहे. लोढा यांच्या या निर्देशानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘गंगा भागिरथी’ या शब्दामुळे खरंच विधवा स्त्रियांचा सन्मान वाढेल का?, असा प्रश्न विचारला जातोय. आता मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिनेही यावर आपलं मत मांडलं आहे. हेमांगीनेही फेसबुक अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत यावर भाष्य केलं आहे.
हेमांगी कवीची पोस्ट
“आता विधवेला ’गंगा भागीरथी’ संबोधून आदर/सन्मान देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. असं संबोधल्यामुळे नक्की काय फरक पडेल किंवा काय बदल होतील कुणी मला नीट समजावून सांगेल का? त.टी – हा टिंगल- टवाळीचा विषय नाही. मी प्रामाणिकपणे विचारतेय याची मंडळाने नोंद घ्यावी”. असं हेमांगीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेमांगीच्या या पोस्टवर नेटकरी मंडळींनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या प्रस्तावाचं स्वागत केलं आहे तर काहींनी विरोध. महाराष्ट्रात विधवांना गंगा भागीरथी म्हणण्याची पद्धत पूर्वापार आहे. त्यात नवीन काय, असा सवाल अनेक युजर्सनी केला आहे. ही पद्धत आमच्याकडे गेली चार पिढ्या आहे. आमच्या पणजीला गं.भा. संबोधलं जायचं, अशी कमेंट एका युजरने केली आहे. यावर हेमांगीनेही उत्तर दिलं आहे. “फरक, बदल, नुकसान, फायदा काय झालं? समजा तसं संबोधलं नसतं तर पणजीला प्रेम, माया, दया, सहानूभुती, आदर यातलं काही मिळालं नसतं का?”, असा सवाल तिने विचारला आहे.