“तशी केविलवाणी अवस्था करून ठेवलीये ह्या राजकारण्यांनी....’’; Girish Oak यांची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 17:08 IST2022-07-31T17:08:16+5:302022-07-31T17:08:55+5:30
Girish Oak Post : . राज्यपालांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील मराठी भाषिकांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. आता राज्यपालांच्या वक्तव्यावर मराठी चित्रपटसृृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक ( Girish Oak) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“तशी केविलवाणी अवस्था करून ठेवलीये ह्या राजकारण्यांनी....’’; Girish Oak यांची पोस्ट चर्चेत
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुंबईबद्दल (Mumbai ) केलेल्या विधानावरून सध्या राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘मुंबई-ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही. मुंबई महाराष्ट्राकडे पैसाच उरणार नाही,’ असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. राज्यपालांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रातील मराठी भाषिकांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. आता राज्यपालांच्या वक्तव्यावर मराठी चित्रपटसृृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक ( Girish Oak) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपालांचा नामोल्लेख टाळत त्यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी राजकारण्यांवर निशाणा साधला आहे.
गिरीश ओक यांची पोस्ट
‘आई बाप भाऊ बहीण नसलेल्या मुलाची जी अवस्था होते, त्याला उठ सूठ कोणीही उपरा काहीही बोलतो,त्याच्या बाजूनी बोलणारं कोणीच नसतं, तशी केविलवाणी अवस्था करून ठेवलीये आपल्या महाराष्ट्राची ह्या राजकारण्यांनी.
माझ्या मुला/मुली कडे कोणी वाईट नजरेनी बघू दे डोळे फोडून टाकीन.
वाईट बोलू दे जीभ हासडून टाकीन.
कोणी बोट दाखवू दे ते बोट छाटून टाकीन.
ही भावना होती महाराष्ट्र निर्मितीतल्या योध्द्यांची, हुतात्म्यांची. त्यांना आज काय वाटंत असेल? आणि मराठीवर महाराष्ट्रावर मनापासून प्रेम करणाºया माझ्या सारख्या असंख्य मराठी माणसांना? ’ अशी पोस्ट गिरीश ओक यांनी शेअर केली आहे.
त्यांच्या या पोस्टवर सोशल मीडिया युजर्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या या पोस्टला पाठींबा दिला आहे.