"इथे येऊन अभिनय करा मग...", नाटक सुरू असताना फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकावर संतापला आस्ताद काळे, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:42 IST2026-03-17T12:42:26+5:302026-03-17T12:42:56+5:30
नाटकाच्या वेळी काही नियम प्रेक्षकांनीही पाळण्याची अपेक्षा कलाकारांकडून केली जाते. मात्र जेव्हा प्रेक्षकांकडून नाटकाचा अवमान केला जातो, तेव्हा अनेकदा कलाकारांचा पाराही चढतो. अभिनेता आस्ताद काळेसोबतही असंच काहीसं घडलं आहे.

"इथे येऊन अभिनय करा मग...", नाटक सुरू असताना फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकावर संतापला आस्ताद काळे, नेमकं काय घडलं?
नाटक आणि मराठी प्रेक्षक यांचं अनेक वर्षांपासूनच असलेलं नातं आता दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. एकीकडे मराठी सिनेमांना थिएटर मिळत नसताना दुसरीकडे मात्र मराठी नाटकांचे प्रयोग हाऊसफूल होताना दिसत आहेत. नाटकांमध्ये आपल्या आवडत्या कलाकाराला थेट अभिनय करताना पाहण्याची संधी चाहत्यांना मिळते. सिनेमा किंवा ओटीटीवर कंटेट बघताना तसं होत नाही. त्यामुळे नाटकाच्या वेळी काही नियम प्रेक्षकांनीही पाळण्याची अपेक्षा कलाकारांकडून केली जाते. मात्र जेव्हा प्रेक्षकांकडून नाटकाचा अवमान केला जातो, तेव्हा अनेकदा कलाकारांचा पाराही चढतो. अभिनेता आस्ताद काळेसोबतही असंच काहीसं घडलं आहे.
मराठी अभिनेता आस्ताद काळे सध्या 'सविता दामोदर परांजपे' या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सध्या सांस्कृतिक कलादर्पणचा व्यावसायिक नाट्य महोत्सव सुरू आहे. या नाट्यमहोत्सवात माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिर येथे 'सविता दामोदर परांजपे' नाटकाचा प्रयोग नुकताच झाला. मात्र या प्रयोगादरम्यान असं काही घडलं ज्यामुळे आस्ताद काळे चांगलाच भडकला होता. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नाटकाच्या सुरुवातीला मोबाईल फोन बंद ठेवा, असं सांगूनही अनेकदा प्रयोगादरम्यान फोन वाजले. त्यातील एक प्रेक्षक फोन आल्यानंतर तो उचलून त्यावर मोठ मोठ्याने बोलत होता. तेव्हाच नाटकाच्या प्रयोगात आस्ताद काळेचा अतिशय संवेदनशील प्रसंग सुरू होता. मात्र फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकामुळे त्याची लिंक तुटली. संतापलेल्या आस्तादने प्रयोग थांबवत स्टेजवरुनच सगळ्यांसमोर त्या प्रेक्षकाला सुनावलं. "आम्ही तुमच्या बदली फोनवर बोलतो...तुम्ही इथे येऊन अभिनय करा" असं तो बोलताना दिसत आहे. पण, प्रयोग मध्येच थांबवल्याने आस्तादने नंतर प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली आणि पुन्हा प्रयोग सुरू केला.
'सविता दामोदर परांजपे' हे नाटक तब्बल ४० वर्षांनी रंगभूमीवर पुन्हा सुरू झालं आहे. या नाटकात आस्ताद काळे, मयुरी देशमुख, संग्राम समेळ यांच्या मुख्य भूमिका आहेत. राजन ताम्हाणे यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे.