"अत्यंत हळवा, सर्वांना मदत करणारा अभिनेता...", अशोक शिंदेंनी सांगितल्या लक्ष्मीकांत बेर्डेंसोबतच्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:58 IST2025-03-20T11:52:12+5:302025-03-20T11:58:50+5:30
अशोक शिंदे हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत.

"अत्यंत हळवा, सर्वांना मदत करणारा अभिनेता...", अशोक शिंदेंनी सांगितल्या लक्ष्मीकांत बेर्डेंसोबतच्या आठवणी
Ashok Shinde: अशोक शिंदे (Ashok Shinde) हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. मराठी मालिका, नाटक तसेच चित्रपट अशा माध्यमात त्यांचा दांडगा वावर आहे. अशोक शिंदे यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, निवेदिता सराफ, नाना पाटेकर अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत.
अलिकडेच अशोक शिंदे यांनी 'लोकशाही फ्रेंडली'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या काही खास आठवणी शेअर केल्या. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "सगळ्याच दिग्गजांसोबत मी काम केलं आहे. निळू फुले तसेच अशोक सराफ यांच्यासोबत अनेक सिनेमे केले आहेत. काही चित्रपटांमध्ये अशोक सराफ माझे वडील होते आणि मी नायक होतो. तर काहींमध्ये मी खलनायक होतो आणि ते हिरो होते. अशा प्रकारचे सिनेमे करताना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या खूप आठवणी आहेत."
पुढे त्यांनी सांगितलं, "लक्ष्मीकांत बेर्डे हे अत्यंत हळव्या मनाचे आणि सर्वांना मदत करणारे अभिनेते होते. त्यावेळी मी पुण्याहून आलो होतो काम मिळवण्यासाठी धडपडत होतो. त्यावेळेला मला कित्येकवेळी लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या घरीच बोलावलं. मला त्यांच्या घरी घेऊन जायचे रात्री जेवण वगैरे झालं की सकाळी कामावर जाताना सोबतच एकत्र गाडीने जाऊ असं ते म्हणायचे. त्यांनी कायमच सपोर्ट केला." असा खुलासा त्यांनी केला.