"कुणाच्या भावना दुखावल्या जातील असं...", सध्याच्या विनोद निर्मितीबद्दल अमेय वाघने मांडलं स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 16:03 IST2025-05-01T15:55:24+5:302025-05-01T16:03:51+5:30
अमेय वाघ हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.

"कुणाच्या भावना दुखावल्या जातील असं...", सध्याच्या विनोद निर्मितीबद्दल अमेय वाघने मांडलं स्पष्ट मत
Amey Wagh: अमेय वाघ (Amey Wagh) हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. उत्तम अभिनय, विनोद बुद्धी आणि मिश्किल स्वभावामुळे तो प्रेक्षकांना आपलंस करतो. सध्या अभिनेता 'शिट्टी वाजली रे' या नव्या कोऱ्या रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अमेय वाघ या शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.याच निमित्ताने अभिनेत्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सध्याच्या स्टॅडअप कॉमेडीवर मत व्यक्त केलं आहे.
नुकतीच अमेय वाघने 'सकाळ प्रिमिअर'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, सध्याच्या विनोद निर्मितीवर भाष्य करताना अभिनेता म्हणाला, "खरंतर मला असं वाटतं की विनोद ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये प्रत्येकाची विनोद सहन करण्याची शक्ती असते ती वेगळी असते. आपल्या कुटुंबामध्येच जर बघितलं, आपण कुठल्या नातेवाईकांची किंवा मित्रांमध्ये कोणाची चेष्टा केली तर त्यामुळे कधीतरी कोणी दुखावलं जाऊ शकतं. विनोद ही गोष्ट आहे ज्यामुळे कधी कुणाच्या भावना दुखावल्या जातील याबद्दल काही सांगू शकत नाही. आताचा काळ असा आहे की ज्यामुळे सोशल मीडियावर केलेला कुठलाही विनोद असेल त्याच्यावर लोकांना रिअॅक्ट होण्याची संधी मिळते. त्यामुळे थोडी भीती वाटते. " असं मत अभिनेत्याने या मुलाखतीमध्ये मांडलं.
अमेय वाघच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. छोट्या पडद्यापासून ते मोठा पडदा असा त्याचा प्रवास राहिला. त्याने मराठी चित्रपटसृष्टीत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत.