“एक अलबेला” साठी मंगेश देसाईची विशेष मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 16:02 IST2016-05-26T10:30:07+5:302016-05-26T16:02:40+5:30
सिनेसृष्टीत एखादी लाट आली की त्या लाटेच्या प्रवाहात सगळेच वाहताना दिसतात. अशीच एक लाट हल्ली सिनेसृष्टीत आली आहे आणि ...

“एक अलबेला” साठी मंगेश देसाईची विशेष मेहनत
सिनेसृष्टीत एखादी लाट आली की त्या लाटेच्या प्रवाहात सगळेच वाहताना दिसतात. अशीच एक लाट हल्ली सिनेसृष्टीत आली आहे आणि ती म्हणजे जीवनपटांची. आपल्या आयुष्यात कतृत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा जीवनपट पडद्यावर साकारणे ही त्या अभिनेत्यासाठी जेवढी मानाची गोष्ट असते, तेवढीच कसोटीही असते. ज्या नटाने प्रेक्षकांना भरभरून दिले असा नट पडद्यावर साकारणे हे एक प्रकारचे आव्हानच असते. अशाच आव्हानाला अभिनेता मंगेश देसाई यांनी तोंड दिले आहे.
बॉलीवूडमध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या भगवान दादांचा जीवनपट उलगडणारा “एक अलबेला” हा चित्रपट येत्या 24 जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पाया रचला जात असताना भगवान दादांची भूमिका कोण साकारणार? हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. प्रत्येक अभिनेत्याच्या लूक्सवर विचार झाल्यावर दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी मंगेश देसाई या नावावर शिक्कामोर्तब केली. तोपर्यंत मेक-अप साठी विद्याधर भट्टे असतील हे ठरले होते आणि त्यांनी भगवान दादांसोबत काम केले असल्याने त्यांच्या चेहऱ्याची ठेवण विद्याधर यांना माहित होती. त्यामुळे लूक्स च्या बाबतीत विद्याधर भट्टे अचूक भगवान दादा उभे करतील यासाठी निर्माते – दिग्दर्शक निश्चिंत होते.
भगवान दादांच्या लकबी, त्यांचे हावभाव,त्यांची बोलण्याची पध्दत, त्यांच्या ऍक्शन्स आणि अनोख्या नृत्यशैली या सगळ्यांचा मेळ मंगेश देसाई यांना घालायचा होता. भगवान दादा असा नट आहे, ज्याने सिनेसृष्टीला भरभरून दिले मात्र त्याच्या फार कमी गोष्टी आज अभ्यासण्यासाठी आहेत.
“अलबेला” हा चित्रपट सोडला तर भगवान दादांची इतर कोणतीही कलाकृती आज उपलब्ध नाही.
याविषयी बोलताना मंगेश देसाई म्हणाले, “मला कळल्या क्षणापासून मी बाकी सगळी कामे बाजूला सारून केवळ भगवान दादांचा अभ्यास केला.” तब्बल 22-25 वेळा “अलबेला” पाहिल्याचे, ते पुढे म्हणाले.
मंगेशने साकारलेले भगवान दादा पाहून ”माझा निर्णय चुकला नसल्याचे” निर्मात्यांनी म्हटले. शूटींगचा काळ हा मंगेशसाठी परिक्षेचा काळ होता. आदल्या दिवशी शूट संपवायचे आणि दुसऱ्या दिवशीच्या सीन्सची माहिती काढून त्यासाठी पुन्हा अलबेला पाहून त्या सीन्स ची रिहर्सल करायची, शूटींग दरम्यान हा मंगेशचा दिनक्रम होता.