पूरग्रस्तांच्या मदतीला धावली 'मनाचे श्लोक' चित्रपटाची टीम, शेतकऱ्यांना केली मोठी आर्थिक मदत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 14:09 IST2025-10-01T14:09:09+5:302025-10-01T14:09:49+5:30
'मनाचे श्लोक' चित्रपटाच्या टीमने पूरग्रस्तांना मदत केली आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीला धावली 'मनाचे श्लोक' चित्रपटाची टीम, शेतकऱ्यांना केली मोठी आर्थिक मदत!
सध्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे सोलापूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाचा सर्वात जास्त फटका शेतकरी बांधवाना बसला आहे. जोमाने वाढलेले पिक पाण्यात जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे बळीराजावर मोठं संकट आलं आहे. यासर्वात 'मनाचे श्लोक' चित्रपटाची टीमने मदतीचा हात पुढे केला आहे.
नुकतंच 'मनाचे श्लोक' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना अडीच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. यावेळी कार्यक्रमात बोलताना अभिनेत्री गौतमी देशपांडे म्हणाली, "महाराष्ट्रात प्रचंड पाऊस पडतोय, ओला दुष्काळ आला आहे. यामुळे आपला बळीराजा संकटात सापडला आहे. आम्ही सगळे कलाकार तर आहोतच, पण त्यासोबत आम्ही सर्व सुजान नागरिक आहोत. त्यामुळे बळीराजासाठी आम्ही थोडं काही तरी करावं असं आम्ही ठरवलं. आम्ही 'मनाचे श्लोक' टीमकडून अडीच लाख रुपये मदत म्हणून देणार आहोत. एवढ्यावर थांबणार नसून अजून मदत जमवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या संकटात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत".
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मराठी कलाकारही पुढे सरसावले आहेत. मराठी कलाकारांनी पूरग्रस्त भागातील गावांना सढळ हाताने मदतकार्याची मोहीम हाती घेतली आहे. 'मनाचे श्लोक' चित्रपटाच्या टीम व्यतिरिक्त अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, अभिनेता श्रेयस राजे, अभिनेता प्रविण तरडे आणि बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सोनू सूद हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहेत.
दरम्यान, 'मना'चे श्लोक' हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून याचे लेखन-दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले आहे. निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा असून, चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.