कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत महेश मांजरेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 11:51 IST2018-03-18T06:21:32+5:302018-03-18T11:51:32+5:30

ज्या कार्यक्रमाची चर्चा फक्त देशातच नाही तर जगभरात असते, ज्याचं प्रत्येक पर्व प्रेक्षकांना नवीन अनुभव देणारं ठरतं, ज्या कार्यक्रमाने ...

Mahesh Manjrekar in the role of Bigg Boss | कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत महेश मांजरेकर

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत महेश मांजरेकर

या कार्यक्रमाची चर्चा फक्त देशातच नाही तर जगभरात असते, ज्याचं प्रत्येक पर्व प्रेक्षकांना नवीन अनुभव देणारं ठरतं, ज्या कार्यक्रमाने हिंदीतच नाही तर आपल्या प्रादेशिक भाषांमध्येही आपली हुकुमत कायम ठेवली असा रिअॅलिटी शोच्या दुनियेतील सर्वात उत्कंठावर्धक बिग बॉस कार्यक्रम आता आपल्या मराठीत सुरु होतो आहे. येत्या १५ एप्रिलपासून महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर म्हणजेच कलर्स मराठीवर बिग बॉसचं हे मराठमोळं रुप बघायला मिळणार आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासूनच बिग बॉसच्या घरामध्ये कोण कोण असणार आणि मुख्य म्हणजे त्याचा सूत्रधार कोण असणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्या प्रश्नाचं उत्तर आता प्रेक्षकांना मिळणार आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे आणि मराठीचा झेंडा ख-या अर्थाने साता समुद्रापार नेणारे महेश मांजरेकर या कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच काही विशेष प्रोमोमधून मांजरेकरांची ही नवी भूमिका प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

बिग बॉस चाहते है ! हे वाक्य जेव्हा कानावर पडतं तेव्हा त्या घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांचंही लक्ष त्या आवाजाच्या दिशेनं वळतं आणि आता काय घडणार याची उत्सुकता लागते. हे सर्व आता आपल्या मायबोलीत मराठीत घडणार आहे. बिग बॉस नेमक्या काय सूचना देईल त्यासाठी काय खास वाक्य असतील, त्याचा आवाज कसा असेल याबद्दल प्रेक्षकांच्या मनात आतापासूनच प्रश्न तयार झाले आहेत. या आवाजासोबतच घरातील सदस्यांशी बाहेरून संवाद साधणारी एकमेव व्यक्ती म्हणजे या कार्यक्रमाचा सूत्रधार. या सदस्यांना कधी प्रेमाने समजावणे तर कधी आपला धाकही निर्माण करण्याचं काम सूत्रधार शनिवार रविवारच्या भागात करत असतो. ही भूमिका महेश मांजरेकर पार पाडणार आहेत. महेश मांजरेकर यांचं व्यक्तिमत्व म्हणजे ते या क्षेत्रात अनेकांसाठी सच्चे मित्र आहेत, काहींसाठी गुरु आहेत, काहींसाठी गॉडफादर. त्यामुळे त्यांच्याबद्दल जेवढं प्रेम आहे तेवढाच आदरही आहे. त्यांच्या या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आता प्रेक्षकांना बिग बॉसमधून बघायला मिळतील.

येत्या १५ एप्रिलपासून बिग बॉसचं हे मराठमोळं रुप प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे कलर्स मराठीवर. या घरात किती सदस्य असतील कोण कोण असतील त्यांच्यामध्ये काय काय घडेल या प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.  
 

Web Title: Mahesh Manjrekar in the role of Bigg Boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.