'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाने दोन दिवसांत किती कोटी कमावले? तब्बल इतक्या कोटींचं आहे बजेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 11:11 IST2025-11-02T11:11:36+5:302025-11-02T11:11:57+5:30
महेश मांजरेकर यांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली?

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाने दोन दिवसांत किती कोटी कमावले? तब्बल इतक्या कोटींचं आहे बजेट
Punha Shivajiraje Bhosle Day 2 Box Office Collection: मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्गज दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' अखेर ३१ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमामध्ये अभिनेता सिद्धार्थ बोडके याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मराठीतील या बिग बजेट सिनेमाकडे संपूर्ण इंडस्ट्रीचे लक्ष लागले होते. सिनेमाची भव्यता आणि ऐतिहासिक विषय पाहता, याने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच वीकेंडचा दिवस असल्यामुळे, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः काल, शनिवारी रात्रीच्या शोला प्रेक्षकांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. अनेक चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांनी शेवटच्या क्षणीही तिकीट मिळवण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र होते. प्रेक्षकांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
दोन दिवसांत केली इतकी कमाई
रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने १९ लाख रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शनिवारच्या वीकेंडचा फायदा घेत चित्रपटाने ३४ लाख रुपयांची कमाई करत चांगली झेप घेतली. अशा प्रकारे, महेश मांजरेकर यांच्या या बिग बजेट सिनेमाने केवळ दोन दिवसांत एकूण ५३ लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाला मिळणारा हा प्रतिसाद पाहता, आज रविवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले'चं बजेट किती?
कोणताही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला सिनेमा बनवताना त्याचे बजेट साहजिकच मोठे असते. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'च्या निर्मितीबद्दल मांजरेकरांनी सांगितले की, सुरुवातीला हा सिनेमा साडेसात ते आठ कोटींच्या घरात पूर्ण होईल, असा अंदाज होता मात्र, चित्रपटाची भव्यता आणि ऐतिहासिक सत्यता जपण्यासाठी लागलेल्या खर्चामुळे अखेरीस या सिनेमाचे बजेट वाढून १३ कोटी रुपयांवर पोहोचले. यामुळे हा चित्रपट निश्चितच मराठीतील सर्वात मोठ्या बजेटच्या सिनेमांपैकी एक ठरला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, पायल जाधव, सिद्धार्थ जाधव, सयाजी शिंदे, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप आणि विक्रम गायकवाड यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटातील कलाकारांनी त्यांच्या अभिनयातून जादू निर्माण केली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांकडून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे.