"तुमची आठवण येते...", लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करताना लेक भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 11:59 IST2023-10-26T11:57:15+5:302023-10-26T11:59:41+5:30
Laxmikant Berde Birthday : सदाबहार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज जन्मदिवस आहे.

"तुमची आठवण येते...", लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करताना लेक भावुक
सदाबहार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज जन्मदिवस आहे. विनोदी अभिनय आणि हास्याचे चौकार मारत चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन करणारे लक्ष्मीकांत अल्पावधीतच प्रेक्षकांचे लाडके लक्ष्या झाले. 'अशी बनवाबनवी', 'एक गाडी बाकी अनाडी', 'धडाकेबाज', 'धुमधडाका', 'झपाटलेला', 'हमाल दे धमाल', 'शेजारी शेजारी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' अशा सुपरहिट मराठी चित्रपटांतून त्यांनी ८०-९०चं दशक गाजवलं. मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी नाव कमावलं. 'मैने प्यार किया', 'बेटा', 'हम आपके है कौन', 'साजन' या हिंदी चित्रपटांतून त्यांनी अभिनयाची छाप रसिकांवर पाडली.
२००४ साली सिनेसृष्टीतील हा हरहुन्नरी कलाकार हे जग सोडून निघून गेला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे. स्वानंदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने "६९वा वाढदिवस...तुमची आठवण येते", असं कॅप्शन दिलं आहे. स्वानंदीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गोड आठवणी शेअर केल्या आहेत.
लक्ष्मीकांत बेर्ड यांनी १९९८ साली प्रिया बेर्डे यांच्याशी लग्नगाठ बांधली. प्रियादेखील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अनेक चित्रपटांत लक्ष्मीकांत आणि प्रिया यांनी एकत्र काम केलं आहे. लक्ष्मीकांत आणि प्रिया यांना अभिनय आणि स्वानंदी ही दोन मुले आहेत. अभिनयनेदेखील आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाची वाट धरली. अनेक चित्रपटांत त्याने काम केलं आहे.