दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या कारकिर्दीतला 'ब्ल्यू जीन ब्लूज' ठरला अखेरचा सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 11:21 IST2017-02-17T05:51:33+5:302017-02-17T11:21:33+5:30
टेक्नोसेव्ही जगात आजची तरुणाई गतिमान झाली आहे, वाढत्या अपेक्षा आणि दिवसेंदिवस वाढणारी स्पर्धातून तात्काळ गवसणी घालण्याचे स्वप्न बाळगणारी ही ...

दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या कारकिर्दीतला 'ब्ल्यू जीन ब्लूज' ठरला अखेरचा सिनेमा
ट क्नोसेव्ही जगात आजची तरुणाई गतिमान झाली आहे, वाढत्या अपेक्षा आणि दिवसेंदिवस वाढणारी स्पर्धातून तात्काळ गवसणी घालण्याचे स्वप्न बाळगणारी ही तरुणाई लवकर नैराश्यात देखील जाऊ शकते. खास करून,नातेसंबंधांतून आलेल्या नैराश्यातून तरुणवर्ग वैफल्यग्रस्त झालेला दिसून येतो. अशा वैफल्य झालेल्या तरुणाची कथा 'ब्ल्यू जीन ब्लूज'' ह्या आगामी सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. डॉ. नितीन महाजन दिग्दर्शित हा सिनेमा आजच्या तरुणाईच्या मानसिकतेचा वेध घेणारा आहे. महत्वाचे म्हणजे, दिवगंत नायिका अश्विनी एकबोटे हिचा अखेरचा सिनेमा म्हणून देखील या सिनेमाकडे पहिले जात आहे. नैराश्याकडे वळलेल्या एका तरुणाभोवती ह्या सिनेमाची कथा जरी फिरत असली तरी यात, अश्विनी एकबोटे यांची व्यक्तिरेखा मनाला चटका लावून जाणारी आहे. डॉ. नितीन महाजन यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनासोबतच लेखक आणि निर्मात्याची धुरा देखील सांभाळली आहे. ह्या सिनेमाबद्दल आपले मत व्यक्त करताना ते सांगतात की. 'मानवी जीवनातील हे चढ-उतार या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आयुष्यात मनाविरुद्ध काही गोष्टी घडू लागल्या की आपण दुखावतो. मनाचे हे दुखणे शारीरिक दुखण्यापेक्षा अधिक गंभीर असू शकतं, कारण याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर आणि त्यासोबतच मानसिकतेवर पडत असतो. अशावेळी कोणतेही अनुचित पाऊले उचलण्याआधी स्वतःला थोडा वेळ देत, आणि सल्लागारांच्या मदतीने आलेले नैराश्य टाळता येऊ शकते'. तसेच आजची तरुणपिढी याच नैराश्यातून जात असून, हा सिनेमा अशा वैफल्यग्रस्त झालेल्या युवकांना स्फुरण देणारा ठरेल, असेही ते पुढे म्हणतात.या सिनेमात राज ठाकूर, श्वेता बीस्ट, डॉ. संजीवकुमार पाटील, राधिका देशमुख आणि अश्विनी एकबोटे यांच्या देखील प्रमुख भूमिका आहे.विशेष म्हणजे या सिनेमाला विविध आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय सिनेमात महोत्सवांमध्ये नावाजण्यात आले आहे. गेल्यावर्षी मेक्सिको येथे झालेल्या सिने पोर्ब फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाला बेस्ट सेल्फ फंडेड चा किताब मिळाला होता, तसेच बार्सेलोना प्लेनेट, मियामी, लॉस एंजेलेस सिनेफेस्ट यांसारख्या अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये हा सिनेमा दाखवण्यात आला असून, 'ब्ल्यू जीन ब्लुस'ला चांगला प्रतिसाददेखील मिळाला आहे.