ललित प्रभाकरच्या ऑन स्क्रिन बहिणीनं त्याला दिलं होतं २५० रुपयांचं स्पेशल पाकीट, कारणही होतं खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:24 IST2025-09-12T11:24:07+5:302025-09-12T11:24:48+5:30

Lalit Prabhakar : सध्या ललित प्रभाकर खूप चर्चेत आहे. त्याला कारणही तसं खास आहे. लवकरच तो 'आरपार' या सिनेमात झळकणार आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहे.

Lalit Prabhakar's on-screen sister Sharmishta Raut gave him a special wallet of Rs 250, and the reason was special too. | ललित प्रभाकरच्या ऑन स्क्रिन बहिणीनं त्याला दिलं होतं २५० रुपयांचं स्पेशल पाकीट, कारणही होतं खास

ललित प्रभाकरच्या ऑन स्क्रिन बहिणीनं त्याला दिलं होतं २५० रुपयांचं स्पेशल पाकीट, कारणही होतं खास

ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. त्याला 'जुळूनी येती रेशीमगाठी' या मालिकेतून चांगलीच प्रसिद्धी मिळाली. सध्या ललित  खूप चर्चेत आहे. त्याला कारणही तसं खास आहे. लवकरच तो 'आरपार' (Aarpar Movie) या सिनेमात झळकणार आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ललितचे अनेक किस्से ऐकायला मिळत आहेत. त्यातीलच एक किस्सा तुम्हाला माहित्येय का, ललितला त्याच्या ऑन स्क्रिन बहिणीने खास कारणासाठी २५० रुपयांचं स्पेशल पाकीट दिलं होतं. चला जाणून घेऊयात हा किस्सा.

ललित प्रभाकरला २५० रुपयांचं स्पेशल पाकीट देणारी ऑन स्क्रिन बहीण दुसरी तिसरी कुणी नसून शर्मिष्ठा राऊत आहे. या दोघांनी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेत शर्मिष्ठाने ललितच्या मोठ्या बहिणीची भूमिका बजावली होती. मालिका संपल्यानंतरही दोघांमध्ये भावा बहिणीचं नातं आहे. शर्मिष्ठाने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ललित प्रभाकर आणि तिच्या पहिल्या कमाईबद्दल सांगितले होते. शर्मिष्ठा म्हणाली होती की,''सुरुवातीला मी ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करत होते. तेव्हा ५०० जणांच्या घोळक्यात मला २५० रुपये मिळाले होते आणि ते पाकीट मी जपून ठेवलं होतं. पण गेल्या दीड वर्षांपासून हे पाकिट माझ्याकडे नाहीये. ते मी ललितला दिलंय.'' 

'या' कारणामुळे शर्मिष्ठाने ललितला दिलेलं २५० रुपयांचं स्पेशल पाकीट

शर्मिष्ठाने पहिल्या कमाईचं जपून ठेवलेलं पाकीट ललितला देण्यामागचं खास कारणही सांगितलं. 'आनंदी गोपाळ' सिनेमातील काम पाहून शर्मिष्ठाने त्याला बक्षीस म्हणून हे पाकीट दिलं होतं. त्यावेळी शर्मिष्ठा त्याला म्हणालेली की, ''तू यापेक्षा काहीतरी भारी काम करशील. पण, आता तू जे काही केलंय ते खूप जास्त भारी आहे. तुझी मोठी बहीण म्हणून मला तुला एक बक्षीस द्यायचं आहे. तेव्हा मी त्याला हे पाकीट दिलं होतं. ही माझी पहिली कमाई आहे. त्या पाकिटावर ज्युनिअर आर्टिस्ट असं लिहिलं होतं. ज्यावेळी मी त्याला हे पाकिट दिलं त्यावेळी मला खात्री होती की नक्कीच तो हे जपून ठेवेल."
 
'आरपार' सिनेमाबद्दल
प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा 'आरपार' या रोमँटिक सिनेमाच्या निमित्ताने हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हा चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील हृता आणि ललितची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. या सिनेमातील गाण्यांनाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
 

Web Title: Lalit Prabhakar's on-screen sister Sharmishta Raut gave him a special wallet of Rs 250, and the reason was special too.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.