विवेक सांगळेनं कोविडनंतर बदलली गणेशोत्सवाची परंपरा, जाणून तुम्हीही करालं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 15:22 IST2025-08-27T15:21:40+5:302025-08-27T15:22:13+5:30
विवेक सांगळे यंदा पहिल्यांदाच मुंबईच्या लालबागेतल्या आपल्या नव्या घरात लाडक्या बाप्पाचं स्वागत करतोय.

विवेक सांगळेनं कोविडनंतर बदलली गणेशोत्सवाची परंपरा, जाणून तुम्हीही करालं कौतुक
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. गणरायांचा उत्सव आज बुधवारपासून जल्लोषात सुरू झाला. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तीमय वातावरण झालं. उत्साह केवळ सामान्य माणसांमध्येच नाही तर सेलिब्रिटींमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. अभिनेता विवेक सांगळे (Vivek Sangle) यंदा पहिल्यांदाच मुंबईच्या लालबागेतल्या आपल्या नव्या घरात लाडक्या बाप्पाचं स्वागत करतोय. विवेक सांगळेनं नुकतंच 'लोकमत फिल्मी'शी बोलताना कोविडनंतर गणेशोत्सवाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. तसेच त्यानं बाप्पासाठी आकर्षक आरास केल्याची माहितीही दिली.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत विवेक सांगळेने यंदाच्या गणेशोत्सवासाठीच्या तयारीबद्दल माहिती दिली. त्याला मूर्ती आणि सजावटीबद्दल विचारले असता तो म्हणाला, "गेल्या काही वर्षांपासून कोविडनंतर मी खूणगाठ बांधली आहे की, गणपतीची मूर्ती ही शाडू मातीचीच असावी. मला वाटतं की, आपण कुठेतरी पर्यावरणासाठी हातभार लावला पाहिजे. इतरांना उपदेश करण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करण्यावर विश्वास आहे", असे त्याने स्पष्ट केले.
विवेकने त्याच्या घरी केलेली सजावटही पूर्णपणे इको-फ्रेंडली आहे. त्याने कुठेही प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूंंचा वापर केलेला नाही. तो म्हणाला, "माझा स्वतःचा अनुभव आहे की, बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीतच खूप छान आणि सुंदर दिसते. गेल्या १४ वर्षांपासून विवेकच्या घरी गणपती बाप्पा येत आहेत आणि गेल्या ५-६ वर्षांपासून तो शाडूच्या मातीच्याच मूर्तीची स्थापना करतो".
या वर्षी स्वतःचं घर झाल्यामुळे बाप्पाकडे आणखी काही मागणार आहेस का, असे विचारले असता विवेक म्हणाला, "घर होणं हे माझ्या खूप स्वप्नांपैकी एक छोटं स्वप्न होतं, जे पूर्ण झालं आहे. अजून खूप स्वप्नं आहेत जी बाप्पाला पूर्ण करायची आहेत. अर्थात, त्यासाठी मीही तितकीच मेहनत घेणार आहे. त्यामुळे बाप्पाकडे एवढंच मागणं आहे की, जसा तू आतापर्यंत माझ्या पाठीशी उभा राहिलास, तसाच इथून पुढेही राहा".