"सचिन यांचं सिनेमासाठीचं योगदान प्रचंड मोठं" पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर क्षितिज पटवर्धन म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 10:09 IST2025-11-27T10:08:56+5:302025-11-27T10:09:22+5:30
सचिन पिळगावकर यांना केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवर लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धननं भाष्य केलं.

"सचिन यांचं सिनेमासाठीचं योगदान प्रचंड मोठं" पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर क्षितिज पटवर्धन म्हणाला...
Kshitij Patwardhan Reacts On Sachin Pilgaonkar Trolling: सचिन पिळगावकर हे मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत यशस्वी कलाकार म्हणून ओळखले जातात. 'अशी ही बनवाबनवी', 'नवरी मिळे नवऱ्याला', 'गंमत जंमत', 'माझा पती करोडपती', 'आयत्या घरात घरोबा' असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी निर्माण केले आहेत. शिवाय ते उत्तम अभिनेता, गायक आणि नृत्यकलावंत देखील आहेत. इतकं असूनही सचिन पिळगावकर गेल्या काही वर्षात बरंच ट्रोल होत आहेत. अशातच आता सचिन यांना केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवर लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धननं भाष्य केलं.
क्षितिज पटवर्धननं नुकतंच मुक्कामपोस्ट मनोरंजनला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये क्षितीज पटवर्धनने सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना क्षितीज म्हणाला, "पुण्यातल्या एका मुलाला मोठ्या दिग्दर्शकापुढे उभं केलं जातं. त्यावर तो दिग्दर्शक विचारतो, 'तू काही गाणी वगैरे लिहिली आहेस का?' त्यावर तो मुलगा म्हणतो, 'नाही सर' मग तो दिग्दर्शक म्हणतो, 'काही हरकत नाही. तू आता काहीतरी लिहून बघ' आणि ते त्या मुलाला पहिली संधी देतात. तो मुलगा म्हणजे मी आणि ते दिग्दर्शक म्हणजे सचिन पिळगावकर. ज्या मुलाला सुरुवातीला अजिबातच आत्मविश्वास नव्हता. त्यानंतर मी एकूण ७२ सिनेमांची गाणी लिहिली".
पुढे तो म्हणाला, "मी आणि माझ्यासारख्या असंख्य कलाकारांना त्यांनी केवळ कामच नव्हे, तर आत्मविश्वासही दिला. मी त्याबद्दल खूपच कृतज्ञ आहे. आपापल्या घरांमध्ये एखादी छोटी गोष्ट झाली तर आपण ती सेलिब्रेट करतो. कुटुंबात एखाद्याला प्रमोशन मिळालं किंवा मुलाला जास्त टक्के पडले तरी आपण ते सर्वांना सांगतो. त्याचं सेलिब्रेशन करतो. तेव्हा आपण असं म्हणतो का की, हा माणूस किती सांगतोय. मला असं वाटतं की, एखाद्याचा संदर्भाबाहेर बाहेर जाऊन अधिक विचार केला जातो आणि एखादी गोष्ट उगाच चघळली जाते".
शेवटी तो म्हणाला, "सचिन यांचं मराठी आणि भारतीय सिनेमासाठीचं योगदान प्रचंड मोठं आहे. दिग्दर्शक म्हणूनच नाही, तर त्यांनी ज्या-ज्या माणसांना, जी-जी मदत केलीय आणि त्यांनी ज्या प्रकारे त्यांचं अस्तित्व टिकून ठेवलं आहे. ते अतिशय महत्त्वाचं आहे. ट्रोलिंग करणारे ट्रोलर्स निघून जातील, पण उद्या कुणी विचारलं त्यांनी काय केलं. तर त्याचं उत्तर असेल... त्यांनी 'अशी बनवाबनवी'सारखा सिनेमा केला. उद्या जाऊन कमेंट्स कुणीच वाचणार नाहीय, पण त्यांचा सिनेमा लक्षात राहणार आहे. त्यामुळे कमेंट्स की काम? यापैकी काय निवडायचं, याचा विचार ज्यानं त्यानं करावा. मला असं वाटतं त्यांचं योगदान कोणीचं नाकारू शकत नाही", असं स्पष्ट मत त्यानं व्यक्त केलं.