"तू नशिबवान आहेस की तुला मी मिळाले" पती समीर वानखेडेंनासाठी क्रांती रेडकरची पोस्ट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 14:24 IST2026-01-16T14:23:46+5:302026-01-16T14:24:15+5:30
क्रांती रेडकरची पोस्ट चर्चेत आली आहे.

"तू नशिबवान आहेस की तुला मी मिळाले" पती समीर वानखेडेंनासाठी क्रांती रेडकरची पोस्ट, म्हणाली...
क्रांती रेडकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'जत्रा', 'फक्त लढं म्हणा' यांसारख्या चित्रपटांमुळे ती घराघरात पोहोचली. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अशातच क्रांती रेडकरनं खास पोस्ट शेअर करत पती समीर वानखेडे यांच्यावरील प्रेम व्यक्त केलंय.
क्रांतीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोंबत कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "९ वर्षांपूर्वी आपण स्वप्नं आणि प्रेमाने भरलेला एक सुंदर प्रवास सुरू केला. या वैवाहिक जीवनातील तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण खास आहे, तुला माहित आहे का, कारण मी माझ्या सर्वात चांगल्या मित्राशी लग्न केले आहे. आपण एकमेकांना आपल्या सर्व चांगल्या गुणांसह आणि उणिवांसह स्वीकारतो आणि यामुळेच आपण इतक्या खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो".
पुढे तिनं लिहलं, "तू इतका प्रेमळ, काळजी घेणारा आणि उदार आहेस की कधीकधी विश्वासच बसत नाही. बाहेरून कठोर दिसणाऱ्या या व्यक्तीचे हृदय सोन्यासारखे शुद्ध आहे. तुझ्यामध्ये आपल्या कुटुंबाबद्दल आणि या जगाबद्दल खूप सहानुभूती आहे. तुझ्या सर्व इच्छा नेहमीच पूर्ण होवोत. तू माझ्या आयुष्यात आहेस हे माझे खूप मोठे भाग्य आहे. आणि हो, मी तुझ्या आयुष्यात आहे हे तुझेही खूप मोठे भाग्य आहे" असं क्रांतीने आपल्या नेहमीच्या खोडकर शैलीत पोस्टच्या शेवटी म्हटलं. क्रांतीच्या या पोस्टनं चाहत्यांची मने जिंकली आहेत.
क्रांतीनं २०१७ मध्ये समीर वानखेडे यांच्याशी लग्न करून वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. क्रांती नेहमीच नवऱ्याला खंबीरपणे साथ देताना दिसते. दोघेही एकमेकांना १९९७ पासून ओळखतात. क्रांती आणि समीर यांचं पदवी शिक्षण एकाच महाविद्यालयात झालं होतं. समीर वानखेडे आणि क्रांती यांना जुळ्या मुली आहेत. झिया आणि जायदा असे त्यांच्या मुलींची नावे आहेत. क्रांती आणि समीर यांचा अगदी सुखाचा संसार सुरू आहे. या दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.