भरत जाधवबरोबर नऊ महिने बोलत नव्हते केदार शिंदे, काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:21 IST2025-08-04T13:19:52+5:302025-08-04T13:21:37+5:30
केदार शिंदे आणि भरत जाधव यांच्यात नऊ महिने होता अबोला!

भरत जाधवबरोबर नऊ महिने बोलत नव्हते केदार शिंदे, काय घडलेलं?
Kedar Shinde Bharat Jadhav Friendship: अभिनेता भरत जाधव (Bharat jadhav) आणि दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक यशस्वी जोडी आहे. त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपट, नाटकं आणि मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची 'सही रे सही' (Sahi Re Sahi) नावाची नाटकं खूप गाजली, ज्याने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. भरत जाधव आणि दिग्दर्शक केदार शिंदे हे घनिष्ठ मित्र म्हणून ओळखले जातात. मात्र एक काळ असा होता, जेव्हा हे दोघं एकमेकांशी जवळपास नऊ महिने बोलतही नव्हते. त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण होण्यामागे नक्की काय घडलं होतं? त्यामागचं कारण आता खुद्द केदार शिंदेंनीच उघड केलं आहे.
केदार शिंदे यांनी नुकंतच 'मुक्कामपोस्ट मनोरंजनला'ला मुलाखत दिली. यावेळी "तुमची अंकुश चौधरी आणि भरत जाधव यांच्यासोबतची मैत्री काळानुसार कशी फुलत गेली, कधी असं झालं का की तुम्ही संपर्कात नव्हता किंवा राग वगैरे आला म्हणून तुम्ही एकमेंकाशी बोललाच नाहीत? असा प्रश्न केदार शिंदे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देत ते म्हणाले, "असं अंकुश चौधरीबरोबर झालं नाही. गेली ५० वर्षे आम्ही एकत्र होतो, अजूनही आहोत आणि यापुढेही ५० वर्षे एकत्र राहण्याची इच्छा आहे. जो काही वाद किंवा संवाद झाला होता, तो भरत जाधवबरोबर झाला होता.हे मी ना मंजूर करणार नाही. मैत्रीत या गोष्टीसुद्धा घडतात".
त्यांनी पुढे सांगितलं, "भरत माझ्याच बिल्डिंगमध्ये राहायचा. मी आठव्या मजल्यावर आणि भरत दहाव्या मजल्यावर राहत होता. ही 'सही रे सही' नाटकाच्या आधीची म्हणजेच २००० सालची गोष्ट आहे. आमच्या दोघांमध्ये काही मतभेद आणि गैरसमज झाले होते. आम्ही दोघे एकमेकांसमोर यायचो, मी त्याच्या समोरून जाताना त्याच्याकडे बघत नव्हतो आणि तोसुद्धा माझ्याकडे बघत नसायचा. आमचं कुटुंब एकमेकांबरोबर बोलायचे, माझी बायको आणि त्याची बायको एकमेकींबरोबर बोलत होत्या. पण मी भरतशी बोलत नव्हतो आणि तो माझ्याशी बोलत नव्हता".
ते म्हणाले, "मग आठ-नऊ महिन्यांनी अशी गोष्ट घडली की, आम्हालाही कळलं नाही आणि आम्ही पुन्हा बोलायला लागलो. त्यानंतर आम्ही परत एकत्र आलो. तर तेव्हा काय झालं होतं हे आता मला आठवत नाहीये आणि मला वाटतं भरतलासुद्धा ते आठवणार नाही. कुठल्या तरी गोष्टीमुळे गैरसमज झाले असतील", असं केदार शिंदे यांनी सांगितलं.