जिया शंकरनं 'मिस्ट्री मॅन'सोबतचा फोटो केला शेअर, अभिषेकसोबत साखरपुड्याच्या चर्चांवर म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:13 IST2025-12-31T12:07:15+5:302025-12-31T12:13:48+5:30
जिया शंकरने शेअर केला 'मिस्ट्री मॅन'सोबतचा रोमँटिक फोटो, अफवांना पूर्णविराम देत म्हणाली...

जिया शंकरनं 'मिस्ट्री मॅन'सोबतचा फोटो केला शेअर, अभिषेकसोबत साखरपुड्याच्या चर्चांवर म्हणाली...
बॉलिवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्री, कलाकारांच्या अफेअर्स आणि ब्रेकअपच्या बातम्या नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. प्रसिद्ध अभिनेत्री जिया शंकर आणि लोकप्रिय युट्युबर अभिषेक मल्हान यांच्या साखरपूड्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यातच अभिनेत्रीनं 'मिस्ट्री मॅन'सोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत या अफवांना पूर्णविराम दिलाय.
जियाने एका 'मिस्ट्री मॅन'सोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना धक्का दिला असून अभिषेकसोबतच्या नात्यावर मौन सोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि जिया एकमेंकाना डेट करत असून लवकरच साखरपूडा करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांवर आता जियानं थेट उत्तर दिलंय. जियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक अत्यंत रोमँटिक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये एक 'हँडसम हंक' तिच्या कपाळावर प्रेमळ चुंबन घेताना दिसत आहे.
जियाने या फोटोसोबत कॅप्शन दिले की, "चला, २०२५ मध्ये या खोट्या अफवा सोडून देऊया". तिच्या या एका वाक्याने हे स्पष्ट झाले आहे की, अभिषेक मल्हानसोबतच्या लग्नाच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. दरम्यान, जियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नसल्याने तो नेमका कोण आहे, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

जिया शंकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटातून ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली होती. त्यानंतर ती 'बिग बॉस ओटीटी २'मध्ये पाहायला मिळाली. जियाने 'पिशाचीनी', 'काटेलाल अँड सन्स' या मालिकांमध्ये काम केलं आहे. दरम्यान, याआधी अभिषेक मल्हानशिवाय, जिया शंकरचं नाव सुनील शेट्टीचा लेक अहान शेट्टीशीदेखील जोडलं गेलं होतं. आता हा 'मिस्ट्री मॅन' कोण हे जाणून घेण्यासाठी जियाचे चाहते उत्सुक झाले आहेत.