स्टार ट्रीटमेंट मागण्यापेक्षा तो आदर स्वतः कमवा!, दामिनी फेम अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 17:23 IST2025-04-25T17:19:39+5:302025-04-25T17:23:54+5:30
Pratiksha Lonkar : प्रतीक्षा लोणकर यांनी नुकतेच एका मुलाखतीत स्टारडमवर भाष्य केलंय.

स्टार ट्रीटमेंट मागण्यापेक्षा तो आदर स्वतः कमवा!, दामिनी फेम अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर स्पष्टच बोलल्या
अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर (Pratiksha Lonkar) यांनी हिंदी आणि मराठी सिनेइंडस्ट्रीत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. त्यांना दामिनी मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत सिनेइंडस्ट्रीतील त्यांची कारकीर्द आणि आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी काही कलाकारांना स्टार ट्रीटमेंट हवी असते, त्यावर आपलं मत व्यक्त केले आहे.
प्रतीक्षा लोणकर यांनी आरपार ऑनलाइनशी साधलेल्या मुलाखतीत स्टारडमवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, त्या मालिकेत मला दोन मुली होत्या. एक त्या मालिकेची नायिका होती आणि ही दुसरी होती. तर ती दररोज आल्यावरती इथे हे नाही ठेवलंय, तिथे ते नाही ठेवलंय. टिश्यू बॉक्स माझा मोठा हवा, मग असं तिचं सगळं सुरू व्हायचं आणि असं आठ- एक दिवस झालं. मी तिला शेवटी एकदा सांगितलं की, अगं तुला नाही वाटत की तुझा याच्यात जास्त वेळ जातोय. तुला आलेले सीन आहेत तिकडे ते पाठ करायचे. तुला करायचे असेल तर ती जी हिरोईन आहे ना म्हटलं तिच्यापेक्षा तुझं कसं चांगलं होईल याचा विचार कर आणि ते जर चांगलं झालं ना तुला आपोआप अनेक गोष्टी मिळतील. म्हणजे तुला मी सांगते ना आपण जेव्हा नवीन सेटवर जातो. तेव्हा मी तुला म्हटलं ना की आपण आधी आपल्याकडे असे तटस्थ नजरेने बघत असतात. सगळे स्पॉटवाले लाइटवाले वगैरे पण जेव्हा आपण एखादा चांगला शॉट देतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात आपल्याला तो आदराचा भाव दिसतो आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्याला विचारतात की मॅडम चाय लाऊ क्या. तर मला वाटते की तुम्हाला हे कमवावे लागेल.
''तुम्हाला स्टारडम कमवायचंय की...''
तुम्ही काय कमवायचे, तुम्हाला स्टारडम कमवायचंय की तुम्हाला आदरही कमवायचा आहे. ते तुम्ही ठरवा. कशाला अगं तू चांगलं काम केलंस की दुसऱ्या दिवशी ते तुला म्हणतील, तुझ्याशी बोलण्यातला त्यांचा फरक तुझ्या लक्षात येईल. पण तू याच्यात तू वेळ घालवशील तर त्याला तुला वेळ नाही देता येणार तर मग मला वाटतं की या सगळ्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं त्यांनी जर आपला हा क्रिएटिव्ह वेळ वाया जाणार असेल तर मला नाही बाबा ते महत्त्वाचं वाटत आणि वाटलंही नाही पाहिजे, असे प्रतीक्षा लोणकर यांनी म्हटले.