अभिनेते डॉ. उजवणे दुर्मिळ आजारानं ग्रस्त, पत्नीची आर्थिक मदतीसाठी साद, म्हणाल्या- 'मी पैसे परत करेन...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 11:05 IST2022-12-14T11:05:32+5:302022-12-14T11:05:58+5:30
Dr. Vilas Ujawane : ‘शुभम भवतू’ या डायलॅागमुळे घरोघरी लोकप्रिय झालेले अभिनेते डॉ. विलास उजवणे सध्या आर्थिक संकटात आहेत.

अभिनेते डॉ. उजवणे दुर्मिळ आजारानं ग्रस्त, पत्नीची आर्थिक मदतीसाठी साद, म्हणाल्या- 'मी पैसे परत करेन...'
‘शुभम भवतू’ या डायलॅागमुळे घरोघरी लोकप्रिय झालेले अभिनेते डॉ. विलास उजवणे (Dr. Vilas Ujawane) सध्या आर्थिक संकटात आहेत. विविध आजारांनी ग्रासलेल्या उजवणे यांच्यावर वैद्यकीय शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन सोशल मीडियाद्वारे करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट लिहून आवाहन करणारे लेखक-अभिनेते राजू कुलकर्णी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, विलास यांना कोल्हापूरहून मुंबईत आणण्यात आल्यानंतर पत्नी अंजली यांच्या ठाण्यातील घरी ते राहिले, पण रात्री त्रास होऊ लागल्याने मेट्रोपोल रुग्णालयात नेण्यात आले.
हार्टचे तातडीने ऑपरेशन करणे गरजेचे असून, २२ ते ३२ लाख रुपयांची गरज भासणार असल्याने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मदत करणार आहेत. शस्त्रक्रियेसाठी हिंदुजा रुग्णालयात हलवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली
असून, तिथेच शस्त्रक्रियाही करण्यात येईल.
सर्वांचे पैसे मी परत करेन - अंजली उजवणे
विलास उजवणेंच्या पत्नी अंजली ‘लोकमत’शी बोलताना म्हणाल्या की, त्यांचा बीपी आणि शुगर लेव्हल खूप कमी झाली आहे. दुर्मिळ अशी रक्ताची कावीळ झाली आहे. सोशल मीडियावरील आवाहनानंतर कलाकार, रसिक आणि सर्वसामान्यांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मदत करणाऱ्यांचे ऋण कधीही विसरणार नाही, पण सर्वांची नावे आणि अकाऊंट नंबर्स मी लिहून ठेवणार असून, सर्वांचे पैसे परत करणार आहे.